Breaking News

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्या म्हणाल्या, म्हाळगीतील सत्राला त्यांनाही बोलवा वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात

मराठी ई-बातम्या टीम

कधी आपल्या ट्विटमुळे तर कधी जाहीर कार्यक्रमातील वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा घटस्फोटाच्या कारणाला वाहतूक कोंडी जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजपाच्या एका कार्यक्रमात आज केले. त्यामुळे शिवसेना नेत्या डॉ.मनिषा कायंदे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली.

डॉ.मनिषा कायदे म्हणाल्या की, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत काय बौध्दीके होतात हे माहीत नाही. पण अमृता फडणवीसांसाठी एखादे सत्र ठेवा असा उपरोधिक टोला लगावला.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत भाजपातर्फे आयोजित कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना खड्ड्यांवरुन नाराजी जाहीर करत हा दावा केला.

अमृता फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील वाहतूक कोंडी घटस्फोटासाठी कारणीभूत ठरवित असल्याचा दावा केला. मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसते, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसते. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते असे सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही असा खुलासाही त्यांनी केला.

मामींनी एक नवीन शोध लावला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कसले बौद्धिक चालते माहिती नाही. पण एकदा असे बौद्धिकाचे सत्र अमृता फडणवीस यांच्यासाठी ठेवावे. कधी तरी मामीलाही बोलवा असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला.

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टोला लगावताना म्हणाल्या की, अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे. अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघत असतो. दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे की, ३ टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भाजपाकडून मुंबईला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. मुंबईचे रस्ते १०० टक्के गुळगुळीत आहेत असा आम्ही कधीही दावा केला नाही. पण जिथे तिथे आम्हाला खड्डे दिसले, ते भरण्याचं आम्ही काम करत आहोत. अमृता ताईंसहित भाजपाच्या इतरांना जो काही त्रास होतोय, तो फार वेगळा असल्याचे त्या म्हणाल्या.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *