Breaking News

येरवडा दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून शोक तर उपमुख्यमंत्र्यांकडून मदत आणि चौकशीचे आदेश पाच मजूरांचा मृत्यू तर पाच मजूर जखमी

मराठी ई-बातम्या टीम

पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजूरांचा मृत्यू तर पाच जण जमखी झाले. सदर घटनेचे वृत्त कळताच मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला करत दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत, तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले.

इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली. मृतांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना आपल्या संदेशातून प्रकट केली.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत आणि दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले.
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *