Breaking News

अखेर नेते, कार्यकर्त्यांच्या अश्रुंसमोर शरद पवार यांचे मन द्रवलेः २-३ दिवसात निर्णयाचा फेरविचार अजित पवार यांच्या मार्फतच कळविला निर्णय

मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भावनिक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेते तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भावनिक होत आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आपला निर्णय बदलावा म्हणून शरद पवार यांना साद घातली. तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय बदलल्याशिवाय आपण जागा सोडणार नाही असे जाहिर करत ठिय्या आंदोलन सुरु केले. यापार्श्वभूमीवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन मनधरणी करत कार्यकर्त्ये आणि नेत्यांच्या भावना पवार यांच्या कानी घातल्या. त्यावर अखेर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत २-३ दिवसांची वेळ मागितली.

अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण अशा नेतेमंडळींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या नेतेमंडळींना त्यांची भूमिका सांगितली असून त्यासंदर्भात अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींसमोरच यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही काहीजण, विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, भुजबळ, वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रोहित पवार, चेतन तुपे, प्रफुल्ल पटेल, अशोक पवार, जितेंद्र आव्हाड आम्ही सगळेजण सिल्व्हर ओक ला गेलो. आम्ही शरद पवारांना सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. त्यांनी मला, रोहितला आणि भुजबळांना सांगितलं, सुप्रियाशीही ते काही गोष्टी फोनवर बोलले, असेही सांगितले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांनी सांगितलं की मी माझा निर्णय सांगितला आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला पुन्हा विचार करायला दोन ते तीन दिवस द्या. आपण शरद पवार साहेबांना दैवत मानतो. तेच म्हणाले मला २-३ दिवस द्या. तर आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. ते म्हणाले मी विचार तेव्हाच करेन जेव्हा सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी जातील. साहेब म्हणाले मला इथे एकही कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे. ते म्हणाले की मला कुणी बसलेलं दिसलं तर मी माझा निर्णय बदलणार नाही, असं उपस्थितांना सांगितलं.

महाराष्ट्रात उस्मानाबाद, बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हे राजीनामासत्र थांबलं पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं. माझ्या म्हणण्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे असा शरद पवारांचा आपल्या सगळ्यांना निरोप आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यांचा एकाचाही राजीनामा स्वीकार केला जाणार नाही. अजिबात नवीन प्रश्न निर्माण करू नका. उपोषणाला बसणं वगैरे करू नका. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरता कामा नये, या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत, अशीही माहिती अजित पवारांनी दिली.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *