Breaking News

अजित पवार म्हणाले, या सरकारला १०० दिवस झाले तरी यांच्यासमोर भलतीच कामे.. दोन्ही पिके वाया गेली ओला दुष्काळ आणि मदत जाहीर करा

महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरी राजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मुंबईतील बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला अलर्ट केले पाहिजे. शिवाय धरणाचे पाणी सोडत असताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे आणि या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे हे विषय मांडणार आहे. मी पालक मंत्री असताना दर आठवड्याला आढावा बैठक घेत होतो. पुणे शहराबरोबरच राज्यातील महत्वाच्या शहरांची आढावा घेत होतो. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश देत होतो अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतो असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाही असे शेतकरी सांगत आहेत अशी दयनीय अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही लोकांच्या घरात पाणी भरले आहे त्यांना तात्काळ धान्याची मदत द्यावी. राज्य सरकारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले तरच लोकांना दिलासा मिळेल. पुण्याला नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतूकीबाबत कुणाचे लक्ष नाही. वाहतूक कोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे ते लक्ष दिले जात नाही असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील जनतेची शंभर रुपयात दिवाळी गोड करणार असे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी एका कंपनीला काही कोटीचे कंत्राट दिले. मात्र अद्याप जनतेपर्यंत शिधा पोचलेला नाही. पारदर्शकपणे व माफक दरात लोकांना हा शिधा मिळावा अशी अपेक्षा आहे. मात्र यात काहीतरी गौडबंगाल आहे असेही बोलले जात असल्याचे ते म्हणाले.

राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. नुसती भरती होणार आहे अशा घोषणा सरकार करत आहेत. तरुण याकडे डोळे लावून आहेत. शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

या सरकारला शंभर दिवस झाले तरी या सरकारमधील लोकप्रतिनिधीना आपण काय बोलतोय आणि कसे बोलतोय याचे तारतम्य राहिलेले नाही. शिवाय अधिकार्‍यांशी उर्मट भाषा बोलली जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा संतप्त सवालही त्यांनी केला.

वास्तविक पाहता पुण्यात २४ तासापेक्षा अधिक काळ पाऊस पडत असताना पालकमंत्री, प्रशासन कुठे आहे? असा सवाल करत पुण्याच्या सर्वबाजूला डोंगर आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्या डोंगरातून, कड्यावरून झिरपणारे पाणी कोठे जाते, ते पाणी वाहून जाण्यासाठी पाईप बसविलेत का, बसविले असतील तर त्यात काही अडकले की नाही या गोष्टी पाहण्याची जबाबदारी प्रशासन आणि पालकमंत्र्यांची आहे. पुण्यातील वाहतूकीचीही समस्या आहे. त्याकडे खरे तर पोलिसांनी पाहिले पाहिजे. त्यासाठी पालक मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. या अनुषंगाने आढावा बैठक घ्यायला हवी पण या सरकारला १०० दिवस झाले तरी वेळ हाय कुठे यांना तर भलतीच कामे आहेत असा खोचक टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *