Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर

मुंबई : प्रतिनिधी

देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पुरोगामी राज्य असल्याचे आतापर्यत सर्वच नेत्यांनी सांगत त्याविषयीच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून सांगितला जातो. मात्र दोनच दिवसापूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचा स्मृती दिन होता. नेमक्या त्याच दिवसाचा विसर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पडला.

राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणीही असो मात्र राज्याच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान असलेल्या फुले-शाहू-डॉ.आंबेडकर यांच्या जयंती असो वा स्मृतीदिन असो त्यांना अभिवादन, आदरांजली वाहिली जाते. तसेच त्यासंदर्भातील राज्य सरकारकडून त्यासंबधीची जाहिरातही प्रकाशित केली जाते. मात्र यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ना अभिवादन केले ना त्याविषयीची राज्य सरकारकडून जाहिरात प्रसारमाध्यमास दिली. विशेष म्हणजे महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना दिवशीच महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाल्याच्या मोठमोठ्या जाहिराती अनेक वर्तमानपत्राना देण्यात आल्या होत्या.

साधारणत: गेल्या महिन्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडणारे आणि राज्याच्या साहित्यात मोलाची भर घालणारे स्व.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली. त्यावेळीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना असाच विसर पडला.

राज्याच्या सामाजिक चळवळीत महत्वाचे योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा विसर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पडू लागला तर आजच्या समाजालाही त्याचा हळू हळू विसर पडून या व्यक्तींनी केलेल्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष होवू शकेल. त्यामुळे आतापर्यत राज्य सरकारकडून सुरु असलेल्या किमान प्रथा तरी बंद करू नका असे मत कॉम्रेड सुबोध मोरे यांनी व्यक्त करत भाजपा सरकारच्या काळात या गोष्टी घडल्या नाहीत. मग स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कसे घडते असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *