Breaking News

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वर्षपूर्ती पुस्तकाचे प्रकाशन या सर्वांच्या हस्ते करण्यात आले.

जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून अनेक जण सरकार पडणार आता पडणार असल्याचे सातत्याने सांगत सारखी टीका करत आहेत. मात्र सरकारच्या वर्ष पूर्ण झाले असून राहीलेला काळही निश्चितच पूर्ण करणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करत आमचे सरकारी तुम्हाला जास्त त्रास तर देत नाहीत ना असे सांगत काँग्रेसला चिमला मुख्यमंत्र्यांनी काढला.

विरोधकांचे नाव न घेता ते म्हणाले की, कोणी कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला. तरी हा महाराष्ट्र आहे. तो आतापर्यत कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही डगमगणार नसल्याचा इशारा दिला.

संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार काम

संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार हे शासन काम करीत असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच वर्षभरात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले असून पुस्तिकेच्या उत्तम निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

 

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *