Breaking News

आर्थिक पाठबळ देण्याऐवजी मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकतय ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन!

मुंबई: प्रतिनिधी
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील अलका टॉकीज चौकात झालेल्या धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत १२५ डॉलरवर असतानाही देशांतर्गत इंधनाचे भाव स्थिर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. परंतु सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल- डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे, हा लोकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे. अगोदरच महागाईने गोरगरिब, सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे, मध्यवर्गीयांचे देखील कंबरडे मोडले आहे. छोटे व्यावसायिकही इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. ही अन्यायी, जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
पुण्यातील आंदोलनात थोरात यांच्यासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते उल्हासदादा पवार, माजी आ. दिप्ती चौधरी, अभय छाजेड, कमलताई व्यवहारे, गोपाळ तिवारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यतील सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करुन मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या धरणे आंदोलनाबरोबर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून SpeakUpForFuelHike ही ऑनलाईन मोहिमही राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, तरूण वर्ग मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाला. उद्या ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकार जोपर्यंत ही अन्यायकारक दरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *