Breaking News

२०१९ हे वर्ष भाजपच्या घर वापसीचे : खा. अशोक चव्हाण काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराची मनोर पासून सुरुवात

मनोर : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत हेच वर्ष भाजपच्या घर वापसीचे राहणार असल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत केंद्र आणि राज्यातील परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

पालघर जिल्ह्यातील मनोर येथून काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबिरांना आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे प्रभारी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १ हजार ७५३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या नावाखाली जबरदस्तीने शेतक-यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. शेतक-याची जात संपवण्याचा विडा भाजप सरकारने उचलला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील शेतक-यांचा, कष्टक-यांचा या सरकारवर विश्वास राहिला नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मोदी आणि फडणवीस निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरले आहेत. वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे काय झाले? असे विचारले असता पंतप्रधान म्हणतात पकोडे विकणे हा रोजगार नाही का?, सुशिक्षित बेरोजगारांनी आता पकोडे विकायचे का? असा संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला.

देशाचे संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव असून याविरोधात २६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्ह्यात  संविधान बचाओ यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, “भाजप धोका है, लाथ मारो मौका है!” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय फायदा उचलण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपच्या सत्ताकाळात काळात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या किंमती वाढवून सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. गरिब, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिलांना काँग्रेसने दिलेले  माहितीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, अन्न सुरक्षा, माहिती, शिक्षणाचा अधिकार असे अधिकार  भाजप सरकारने काढून घेतले आहेत. जपानच्या पंतप्रधानांना निवडणूक जिंकून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प आणल्याचा आरोप केला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *