Breaking News

मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

अनिल देशमुख यांचा जसा तातडीने राजीनामा घेण्यात आला तोच न्याय मलिक यांना लावला पाहिजे. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रशिक्षण विभागाचे संयोजक योगेश गोगावले, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. अशा देशद्रोही कारवायाना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केल्याची  टीकाही त्यांनी केली.

१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे, असा आरोप करून, ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवाब मलिक या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक साह्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *