Breaking News

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..

काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. भारतयात्रींच्या आदरातिथ्यात आपण कुठेही कमी पडलो नाही.
ही यात्रा यशस्वी करून देशाला एक संदेश देण्यात आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रेचे समन्वय बाळासाहेब थोरात यांनी खुले पत्र लिहून सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
हे पत्र खालील प्रमाणे…

भारत जोडो यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार !
नमस्कार,
खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आणि दोन महिन्यानंतर ७ नोव्हेंबरला या पदयात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केला. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर हजारो लोकांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना अभिवादन करून राहुलजी व भारतयात्रींनी हजारो मशाली हाती घेत क्रांतीची मशाल पेटवली.
मंदिर, मशिद, बौद्ध विहार, गुरुद्वारामध्ये जाऊन भारताची खरी ओळख असलेल्या विविधततेली एकतेचे दर्शन केले. देगलूर येथून सुरु झालेला महाराष्ट्रातील पदयात्रेचा हा प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संपला. १४ दिवासांच्या या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा दररोज हजारो लोक जमा होऊन राहुलजी गांधी व भारतयात्रींची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र दिसले. पहाटेच्या वेळी माता भगिणींनी यात्रा मार्गावर सडा टाकून रांगोळी काढून यात्रेचे स्वागत केले. या मार्गावर महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडले. लोकांनी उस्फूर्तपणे येऊन भारत जोडो यात्रेत आपले योगदान दिले. नांदेड व शेगाव येथील जनसभेने तर गर्दीचे उच्चांक मोडले, विशेषतः शेगाव येथे जमलेला लाखोंचा जनसमुदाय परिवर्तनाचे संकेत देऊन गेला. सभास्थळ भरगच्च भरले होतेच पण सभास्थळाच्या आजूबाजूचा परिसरही लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ही फक्त सभेची गर्दी नव्हती तर इतिहास घडवणाऱ्या एका महत्वपूर्ण घटनेचे ते साक्षीदार झाले.
राहुल गांधी यांच्या बरोबर चालणाऱ्या सर्व भारतयात्रींचे आदरातिथ्य करण्यात महाराष्ट्राने कसलीही कमतरता ठेवली नाही. दररोज हजारो लोकांच्या राहण्याची, त्यांच्या जेवणाची, विश्रांतीची, औषधोपचारांची व्यवस्थीतपणे काळजी घेतली. आपण सढळ हस्ते सेवाकार्यात सहभागी झालात. याकामी हजारो लोक झटले, रस्त्यांच्या कडेला उभे राहून भारतयात्रींना फळे, पाणी, चहा देण्याचे काम स्वच्छेने केले. भारत जोडो यात्रा ही आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून हजारो ज्ञात-अज्ञात हातांनी सहभागी होत आपापल्या परिने योगदान दिले.
‘अतिथी देवो भवची महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी जशा पालख्या निघतात व यातील वारकऱ्यांचे स्वागत व आदरातिथ्य मराठी माणूस करतो त्याच पवित्र भावनेचे दर्शन या पदयात्रेतही झाले, हीच महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आहे. भारतयात्रींच्या पाहुणचारात आपण तसुभरही कमी पडू दिले नाही. भारत जोडो यात्रेच्या या महायज्ञात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला एक संदेश दिला आहे. ही पदयात्रा यशस्वीपणे पार पाडण्यात महाराष्ट्रातील जनतेसोबतच अनेकांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

धन्यवाद.

नाना पटोले                   बाळासाहेब थोरात
(प्रदेशाध्यक्ष)              (भारत जोडो यात्रा समन्वयक)

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *