अतुल लोंढे यांचा पलटवार, जुमलेबाजी व फेकुगिरी करणाऱ्या भाजपाने काँग्रेसला शिकवू नये

भारतीय जनता पक्ष हाच मुळात मिस कॉल, इव्हेंट व जाहिरातबाजीवर फुगलेला पक्ष आहे, त्या पक्षाने काँग्रेसच्या जाहिरातीवर टिका करणे हास्यास्पद आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती आहे परंतु उगाच हवाबाजी करण्याचा ‘शौक’ भाजपा व आशिष शेलार सारख्या सुमार नेत्याना जडला आहे. अहंकारी तानाशाहचे दिवस भरले असून जनताच काँग्रेस व मित्रपक्षाला साथ देणार आणि ‘हात देशाची परिस्थिती बदलेल’ असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

मुंबई भाजपाचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्या टिकेला उत्तर देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रकाशित केलेल्या पहिल्याच जाहिरातीने आशिष शेलार व भाजपाची झोप उडवल्याचे दिसत आहे. मागील जुमल्यांचे उत्तर तर भाजपाला द्यावेच लागेल असा जळजळीत प्रश्न विचारल्याने ‘हाथ बदलेगा हालात’या काँग्रेसच्या जाहिरातीवर टीका करावी लागत आहे. टीका करताना आशिष शेलार यांना बियर, व्हिस्की, वाईन,पेग याचीच आठवण आली यात नवल करण्यासारखे काहीच नाही कारण त्यांचा पक्ष यातच आकंठ बुडालेला आहे. भ्रष्टाचारावर भाजपा व आशिष शेलार यांनी बोलावे हा तर सर्वात मोठा राजकीय विनोद आहे. देशभरातील सर्व पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना ईडी, आयकर, सीबीआयच्या कारवाईची धमकी देऊन भाजपात आणले आहे. आता भारतीय जनता पक्षात भाजपाचे मुळ नेते व कार्यकर्ते दुर्बिण लावूनही सापडत नाहीत ही शेलरांच्या भाजपाची अवस्था आहे. पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्लेले भ्रष्ट नेते आशिष शेलारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत याचेही शेलारांना भान राहिले नाही.

अतुल लोंढे म्हणाले, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला व जगात भारताची ओळख निर्माण केली आहे. ज्या लोकांना देश २०१४ ला स्वतंत्र झाला व २०१४ नंतरच देशाने प्रगती केली असे वाटते त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही, त्यांनी त्याच स्वप्नरंजनात रमावे. परंतु देशातील जनतेने परिवर्तनाचा निश्चय केला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटिश साम्राज्यालाही या देशाच्या जनतेने पळून लावले तर भाजपा काय चिज आहे? ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्या जुमलेबाज, फेकू भाजपाला जनताच ‘बुरे दिन’ आणणार ह्याची नोंद आशिष शेलार व भाजपाने घ्यावी, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *