Breaking News

महायुतीत आणि महाविकास आघाडीत नेमका वरचष्मा कोणाचा?

देशात लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुकले गेले आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा समावेश आहे. या दोन्ही तिन्ही पक्षांच्या आघाडी आणि युतीतील पक्षांवर वरचष्मा कोणाचा याचा विचार केला तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा वरचष्मा तर महायुतीत भाजपाचा वरचष्मा असल्याचे काही घटनांवर दिसून येत आहे.

वास्तविक पाहता शिवसेना पक्षात जी काही बंडखोरी झाली त्याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच महाशक्तीच्या नावाने केला. परंतु ही महाशक्ती दुसरी-तिसरी कोणतीही नसून भाजपाच असल्याचा खुलासा राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर झाला. त्यातच काही महिन्याच्या अंतराने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शिवसेना स्टाईल बंडखोरी अजित पवार यांच्या रूपाने झाली.

मात्र या दोन्ही पक्षात बंडखोरी करणाऱ्या आणि बंडखोरांना साथ देणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. या बंडखोरांच्या मदतीने राज्यातही शिवसेना शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्र्यांच्या माध्यमातून भाजपाला अपेक्षित असलेल्या राजकिय घडामोडींची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. त्याचा परिणाम राज्यातील उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या काही राजकिय कार्यकर्त्यांवर अपेक्षित असा झाला. त्यातून ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडल्याही गेल्या.

परंतु याच कालावधीत देशातील लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्याने भाजपाच्या अमर्यादा अपेक्षांना नवीन धुमारे फुटले. त्यासाठी या बंडखोरांना वापरून घेण्याचे नवे तंत्र भाजपाने पध्दतशीरपणे विकसित करत त्या विकसित घोषणेनुसार सर्व बंडखोर नेत्यांना पध्दतशीरपणे भाजपाच्या विकासासाठी कामाला लावले गेल्याचे सध्याच्या राजकिय घडामोडींवरून दिसून येत आहे. राज्यात भाजपासोबत महायुतीत सहभागी असलेल्या राजकिय पक्षांना भाजपाने निवडणूकीत समान जागा देणार असल्याचे धारिष्ट केले. परंतु उमेदवार आणि मतदारसंघ निवडीवर मात्र पक्षाचा वरचष्मा ठेवला. त्यामुळे अजित पवार यांचा गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असेल या दोघांना त्यांच्या समर्थक विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याबाबत काही अटी व शर्ती लादण्यात आल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तर दुसऱ्याबाजूला परस्पर सहमतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा पक्षाने राजकिय गरजेतून महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र या गरजेत एकमेकांना सांभाळून घेणे आणि राजकिय वाटचालीत एकमेकांना साथसोबत करण्याची जबाबदारी सुरुवातीला शिवसेना उबाठा गटाने पार पाडली.

त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीचा फायदा आणि त्याचा फटका भाजपाबरोबरच महाविकास आघाडीतील इतर सहभागी पक्षांनाही बसतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. या शक्यतेवर मात करण्यासाठी आणि केंद्रातील भाजपाच्या सत्तेला आव्हान निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा फार्म्युला पुन्हा एकदा वापरण्यात आला. या यात्रेमुळे काँग्रेसचा काठावर असणारा मतदार पुन्हा एकदा सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एखदा मुळ पदावर आल्याचे दिसून येत असल्याचे पाह्यला मिळाले.

या सगळ्या घडामोडींत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा मतदार आता काय भूमिका घेतो यावरून राजकिय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली. त्यातून उमेदवार निवडीपासून ते शरद पवार यांच्या खास पवार शैलीतील राजकारणाची झलक पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दिसायला लागली. यातूनच सातारा ची लोकसभा मतदारसंघाची जागा विद्यमान खासदाराने सोडून देणे तर त्याच लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकणे आदी गोष्टी समोर आल्या.

या राजकिय खेळात महायुतीत जशा पध्दतीने भाजपाने आपला वरचष्मा ठेवत राजकिय सोंगट्या हलवित महाशक्ती असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरु केला. अगदी तसाच नाही मात्र एक सुरक्षित खेळी शिवसेना उबाठा गटाने खेळत त्यांच्या हिश्शाला येणाऱ्या जागांवर सरसकट नसले तरी काही निवडक जागांवर पक्षाचे उमेदवार जाहिर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसला एकप्रकारे झुलविण्याचे काम करत राज्याच्या महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा वरचष्मा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न राजकिय वर्तुळात केला.

आज स्थितीला राज्याच्या राजकारणात खरी लढत भाजपा विरूध्द शिवसेना उबाठा गटातच होणार असल्याचा एकप्रकारचा संदेश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक भाजपाबरोबर शिवसेना-उबाठा गटाच्या नेत्यांकडून होत आहे. या प्रयत्नाचा आणि राजकिय वरचष्म्याचा आभास निर्माण करण्यात कोण किती यशस्वी झालं याचे उत्तर लोकसभा निवडणूकीनंतरच राज्यातील जनतेला मिळणार आहे.

परंतु सध्याच्या या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या अस्तिवावरून जनतेमध्ये सरळसरळ दोन विभाग पाडण्यात सध्या तरी या युती आणि आघाडीला यश आल्याचे दिसून येत आहे.

Check Also

अॅड असीम सरोदे यांचा आरोप, न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतरही एक हजार कोटींच्या रोख्यांची छफाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *