Breaking News

अमित शाह यांची घोषणा, तिसऱ्या टर्ममध्ये मोदी देशाला तिसऱ्या स्थानावर नेणार

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप आणि कार्यक्रम अद्याप जाहिर झालेला नाही. तरीही काँग्रेस, भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने भाजपाचे नेते अमित शाह यांनी जळगांव येथून भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी आयोजित जाहिर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, मागील ५० वर्षाच्या काळात अर्थात काँग्रेसच्या काळात अयोध्येत राम मंदिर उभारणीला लागले. मात्र मोदींच्या १० वर्षाच्या काळात अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे राहिले आणि जगातील पाचव्या स्थानाची देशाची अर्थ व्यवस्था बनली. देशातील १४० कोटी जनतेच्या विकासासाठी देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मोदींनी तिसरी टर्म मागितली असल्याचे सांगत तिसऱ्यांदा मोदींना संधी दिल्यास पहिल्या तीन देशांच्या अर्थव्यवस्थे इतकी देशाची अर्थव्यवस्था आणणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, विरोधी पक्षांची महाविकास आघाडी ही तीन चाकांची रिक्षा आहे. मात्र या तीन चाकांच्या रिक्षाचे टायर पंक्चर झाले आहेत अशी टीका करत ५० वर्षे आपण शरद पवार यांना संधी दिली. परंतु यावेळी शरद पवार यांना संधी द्यायची नाही असे आवाहन करत अजित पवार यांना आपणास संधी द्यायची असल्याचे आवाहन करत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना फक्त राहुल गांधी पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते प्रचार करत आहेत. तसेच काँग्रेसकडे कोणताही विकासाचा अजेंडा नसल्याचे सांगत त्या पक्षाला निवडूण दिल्यास तुम्हाला काय मिळणार असा सवाल करत मोदींना तिसऱ्यांचा संधी दिली तर ते तुमच्यापर्यंत विकास आणणार असल्याचेही सांगितले.

अमित शाह पुढे म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या लोकसभा उमेदवारांबरोबरच महायुतीच्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी मदत करावी असे आवाहन यावेळी केले.

अमित शाह यांनी राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश भाजपाचे नेते अमित शाह यांनी मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ६ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत शाह बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत श्री.शाह यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.

यावेळी अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकास कामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा असे आवाहनही केले.

यावेळी अमित शाह यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करण्यासाठी आपणा सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे, असा कानमंत्र देत महायुतीचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे असे समजून एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र काम करा असे आवाहनही यावेळी केले.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे, असेही शाह यांनी नमूद केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *