Breaking News

अजित पवारांचा सवाल, ३६५ दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या किती

गुजरात राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच भर पगारी सुट्टी दिल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्यांवरही भाष्य केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुळात ३६५ दिवसात जवळपास सर्वच प्रकारच्या पगारी, आजारी सुट्टया असतात त्या जवळपास पावणेदोनशे सुट्टया आहेत. ५२ आठवडे ५२ आणि ५२ झाले एकशे चार आणि शनिवार रविवार म्हणजे एकशेसहा सुट्टया तिथेच गेल्या. शिवाय सण, महापुरुषांच्या जयंत्या यामध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे राज्याचा गाढा हाकताना इथे काम करणारा अधिकारी, कर्मचारी हा जर सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि सहाच महिने काम करत असल्याचे स्पष्ट केले.

मी अर्थमंत्री असताना त्याबद्दल ज्यावेळी ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी चर्चा केली होती. यामध्ये काहीतरी आपल्याला थोडासा बदल करण्याची गरज आहे. परंतु बदल करत असताना संघटना, कामगार नेते यांना विश्वासात घेऊन मार्ग काढला पाहिजे. परंतु त्याचवेळी जनतेलाही कळले पाहिजे की, यांना ३६५ दिवसात किती दिवस सुट्टया मिळतात असे माझे मत होते त्यात लक्षही घातले होते. मात्र तोपर्यंत आमचे सरकार गेले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय आहे. परंतु शेजारच्या राज्यात निवडणूका आहेत म्हणून आपल्या राज्यातील ठराविक जिल्हयात पगारी सुट्टी जाहीर केली आहे हे पहिल्यांदाच पहायला मिळाले. दर पाच वर्षांनी निवडणूका येतात परंतु मला कधी आठवत नाही. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शेजारच्या राज्यात निवडणूका लागल्या तर सुट्टी दिली आहे. हा आपण संसदेची निवडणूक समजू शकतो. पण असे आदेश पहिल्यांदा काढले हे पहायला मिळत आहे. वास्तविक असे नवीन पांयडे पाडणे चुकीचे आहे असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्य येत आहे. त्यामध्ये जी वक्तव्ये अजिबात करण्याची गरज नाही. तरीही अशाप्रकारची वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून वाचाळवीरांना आवरा सांगितले होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टिका टिपण्णी होत नव्हती. अशापध्दतीचे महाराष्ट्राने ऐकले नाही किंवा खपवूनही घेतले नाही. आता तर वरीष्ठ पदावर बसणारी महत्त्वाच्या व्यक्तींना तारतम्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्त्यांना बोलण्याचे तारतम्य राहिलेले नाही. बोलून पण चूक झाली नाही माझ्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला म्हणजे एखाद्याने चुकल्यावर दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो. परंतु तशापध्दतीचे होताना दिसत नाही. काहींनी तर कहरच केला आहे. कुणाबद्दल काय बोलतो याचे तारतम्य राहिलेले नाही. वास्तविक बोलताना तारतम्य आमच्यासहीत सर्व लोकांनी ठेवले पाहिजे. मी सत्ताधारी पक्षाला बोलतो असे नाही आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी कायदा, नियम, संविधान या सगळ्या गोष्टी काय सांगतात याचा अभ्यास केला पाहिजे, लक्ष दिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *