Breaking News

या दळभद्री सरकारला उलथवून टाका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

कोल्हापूर – कागल: प्रतिनिधी

लाखांचा पोशिंदा सुखी नाही… आया बहिणी सुरक्षित नाहीत… कुपोषणाने डोके वर काढले आहे… अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे असलं दळभद्री सरकार असून याला उलथवून टाका अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कागलच्या जाहीर सभेत केली.

१५ लाख कोटी जमा झाले त्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. किती नोटा जमा झाल्या याची माहिती देत नाहीत. गरीबाला शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचे काम झाले आहे. 

समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होवू नये यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. एकदा उमेदवार दिला की, त्याचे काम इमाने-इतबारे केले पाहिजे. राज्यावर फार मोठा अन्याय होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.  

संपुर्ण राज्यात ऊस टिकला. त्या उत्पादकांनाही पुर्णपणे एफआरपी सरकार देत नाही. देतो ना… चाललंय ना… हेच उत्तर मुख्यमंत्री देत आहेत. अरे काय चाललंय या सरकारचं असा सवालही उपस्थित करत भावनेच्या आहारी जाऊन मतदान करु नका, बटण दाबू नका असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या बाजुने निर्णय घेणारे कोण मंत्रीमंडळात नाहीत, म्हणुन आपली अवस्था झाली आहे. आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय का… अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला काय झालंय असा संतप्त सवाल करत पैशाची सौदेबाजी, पैशांचा बाजार आम्ही आमच्या काळात कधी मांडला नाही. परंतु या सरकारच्या काळात ही सौदेबाजी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या नेत्यांना जनता मारेल की काय अशी भिती वाटत असून त्यांच्या वक्तव्याकडे त्यापध्दतीने पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मोदी – फडणवीसांना ‘पहिली कॅबिनेट’चा रोग लागलाय -जयंतराव पाटील

पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो मोदी म्हणाले… देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षण देतो सांगितले. मोदी आणि फडणवीस यांना ‘पहिली कॅबिनेट’ हा रोग लागल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

देशाच्या समोर गरजा, समस्या खूप आहेत. प्लॅनिंग समिती नसल्याने करोडो रुपये खर्च न करण्याचे धाडस मोदी सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोदी सरकारने देशातील न्यायिक व्यवस्था ताब्यात घेतल्या. प्लॅनिंग समिती बरखास्त केली. रिझर्व्ह बॅंक, सीबीआयमध्ये घुसखोरी केली. संविधान बदलण्याची भूमिका मोदी सरकारची होती. मुठभर लोकांचे संवर्धन करण्याचे काम केले जाईल म्हणून संविधान बचाव आंदोलन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारला दूर करावे हे आवाहन करण्यासाठी येथे आल्याचे सांगत या भाजप सरकारने गोरगरिबांना दैनंदिन जीवन जगणं कठीण करुन टाकलं आहे. साडेचार वर्षे या सरकारने फार मोठा अन्याय केला आहे असा आरोप माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर सभेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक,राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *