Breaking News

उध्दव ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांचा इशारा, १८ पैकी १२ खासदार अनं २२ आमदार… शिवसेना पक्ष आमचा आहे अनं तो पुन्हा उभा करू

शिवसेनेतील बंडखोरीनंतर किमान राहिलेले तरी आपल्या सोबत रहावेत किंवा आहेत की नाहीत या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून झाडून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडत त्यांची मते जाणून घेत आहेत. तसेच आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांना इशारा देत १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकावित ५५ पैकी ४० आमदार आणि पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही सोबत नेले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी झाडून सर्व शिवसैनिकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आज त्यातच गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या केंद्रीय स्तरावरही मोठी फूट पडणार असल्याचा इशारा दिला.

१८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा दाव केला. यावेळी त्यांनी विद्यमान ५५ आमदारांपैकी ४० आमदार आमच्यासोबत आहे. तसेच आता शिवसेना पक्ष आमचा असल्याचे सांगत तो पुन्हा उभा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते मुंबईहून जळगावला परतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे येत आहेत. आता पार्टी कुणाची, तर आमची. ४ खासदारांना तर मी स्वतः भेटलो आहे. आमच्यासोबत २२ माजी आमदार देखील येणार आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू. आम्ही ‘तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो’ हे बाळासाहेबांचे शब्द पुन्हा महाराष्ट्रात घमवू. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्यांचा गैरसमज झाला होता त्या कार्यकर्त्यांनी आरोप करणं साहजिक आहे. आमची बाजू त्यांना माहिती होत नाही, तोपर्यंत ते आरोप करतील हे आम्हालाही माहिती होतं. मात्र, बाजू मांडल्यानंतर जळगावमधील वातावरण पहिल्यापेक्षा शांत झालं आहे. मला वाटतं आम्ही सत्तेसाठी बाहेर पडलेलो नाही. सत्ता सोडून बाहेर पडलो असेही ते म्हणाले.

लोकं सरपंचपदाची खुर्ची सोडत नाही. आम्ही मंत्रीपदं सोडून बाहेर निघालो. १ नाही तर ८ मंत्री बाहेर पडले. याचा अर्थ आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे. शिवसेना पक्ष संपणार अशी आम्हाला भीती वाटत होती. तो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी हा उठाव केला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मला संजय राऊत यांना उत्तर देण्याची गरज नाही. ते खासदार म्हणून बसलेत त्यात आमचंही एक मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मताची किंमत ठेवावी, एवढीच त्यांना विनंती राहणार आहे. मला मंत्रिपद तर मिळणारच आहे, ते साहजिक आहे. मला कोणतं खातं हवं यावर बोलायचं नाही. एकनाथ शिंदे जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी सांभाळेल असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *