Breaking News

किरीट सोमय्यांचा काल सत्कार आज सोमय्यासह ३०० जणांच्या विरोधात गुन्हा पुणे पोलिसांची कारवाई

मराठी ई-बातम्या टीम

शिवसैनिकांच्या घराड्यातून सोमय्या यांना बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांच्या झटापटीत पुणे महापालिकेच्या पायऱ्यावर पडलेल्या किरीट सोमय्या यांच्या सन्मानार्थ त्याच पायऱ्यावर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. परंतु या सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही पुणे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ३०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित गर्दी करत सोमय्यांचा सत्कार केला. त्यामुळे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी आणि पोलिसांनी परवानगी नाकरली असतानाही पुणे महापालिका आवारात सत्कार सोहळा आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी किरीट सोमय्या, पुणे भाजपाध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

पुणे येथील जंबो कोविड सेंटरच्या कंत्राट वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप करत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेत गेले होते. परंतु तेथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातून शिवसैनिकांच्या घराड्यात अडकलेल्या सोमय्या यांना बाहेर काढत गाडीकडे नेताना सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यानंतर शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे भाजपाकडून त्यांचा त्याच पायऱ्यांवर सत्कार करण्याची घोषणा करत काल त्यांचा पालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार केला.

पोलिसांनी या सत्काराच्या कार्यक्रमास विरोध दर्शवला होता. मात्र तरी देखील भाजपा कार्यकर्ते महाापालिकेच्या आवारात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी महापालिकेच्या आवारातील काही वस्तूंचे नुकसान झाल्याचेही समोर आले. शिवाय, एकाच जागेवर पाच पेक्षा जास्त लोक जमल्याने, आदेशाचेही उल्लंघन झाले. या प्रकरणी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह ३०० जणांविरोधात आज (रविवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी फिर्याद दिली.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शहाराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच त्यांच्यासोबत जवळपास ३०० च्या आसपास जमाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आला होता. त्यावेळी आम्ही त्यांना तुमचा जमाव बेकायदेशीर आहे, तुम्ही येथून निघून जा असं वारंवार सांगितले होते. मात्र कार्यकर्ते घोषणाबाजी करत राहीले आणि काहीवेळाने महापालिकेच्या आवारात शिरले. या दरम्यान आवारातील काही साहित्याचे नुकसान देखील झाले आहे. त्याचबरोबर पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एका जागेवर एकत्रित येऊ नये, या आदेशाचा देखील त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *