Breaking News

भलतंच काय! किरीट सोमय्याने जारी केलेली कागदपत्रे आणि सरपंचाचा खुलासा ती बंगले नव्हे तर घरे होती

मराठी ई-बातम्या टीम

रेवदंडा येथील कोर्लाई गावात उध्दव ठाकरे यांचे १९ बंगले असून ती सगळी बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर त्यासंदर्भातील जाब शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विचारत ते बंगले आहेत कुठे असा सवाल करत ते बंगले दाखवाच असे आव्हानच सोमय्यांना केले. त्यावर सोमय्या यांनी नवी दिल्लीत भल्या सकाळी पत्रकार परिषद घेत त्यासंदर्भातील कागदपत्रेच जारी केली. तसेच ग्रामपंचायतीची रश्मी ठाकरे यांनी लेखी माफी मागितल्याचा दावाही सोमय्यांनी केला.

त्यानंतर कोर्लाई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने सोमय्या यांच्या आरोपातील हवाच निघुन गेल्याचे दिसून येत आहे. ती घरे अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी माहिती मिसाळ यांनी देत १९ बंगले नाही तर १८ घरे बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. आणि २०१४ ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली.

सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जमिनीवर प्रत्यक्षात १८ च घरे होती. २००९ ला अन्वय नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही घरे घेतली होती. त्यांना रिसॉर्ट तयार करायचे होते. त्यानंतर सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी तो प्लॅन रद्द केला. त्यानंतर त्यांनी त्या जागेची लेव्हलिंग करून तिथे झाडे लावल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी ही घरं पाडल्यानंतर देखील २०१४ पर्यंत तिथल्या १८ घरांची घरपट्टी चालू स्थितीतच राहिली. २०१४ पर्यंत अन्वय नाईक यांनी घरपट्टी भरली आहे. २०१४ला मनीषा वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी ती जागा विकत घेतली. मात्र, २०१९ला अर्ज करून त्यांनी संबंधित जागेची मालकी त्या दोघींच्या नावावर केली. आजच्या स्थितीत २०२१मध्ये तिथे एकही घर नसल्यामुळे आम्ही ती घरं कागदोपत्री रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

रश्मी उद्धव ठाकरेंचा कोणताही माफीनामा आजपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध झालेला नसल्याचे सरपंचांनी स्पष्ट करत ठाकरे कुटुंबापैकी कुणीही आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी कधीही ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केलेला नाही. जे काही आहे, ते आम्ही रीतसर केले. २०२१पर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घरपट्टी भरलेली आहे. हा व्यवहार झाला, तेव्हा ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. फक्त कागदावर होती. साधारण ३ ते साडेतीन हजार चौरस फुटांची घरपट्टी होती. आम्ही त्यांना त्यासंदर्भात पत्र लिहिली होती. त्यानंतर त्यांनी घरपट्टी भरली. मात्र नंतर त्यांनी आम्हाला सांगितले की तिथे घरे अस्तित्वात नाहीत. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून घरपट्टी रद्द केल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

संबंधित वादग्रस्त जमीन ही मूळ ख्रिश्चन समाजाची असून त्यांच्याकडून अन्वय नाईक यांनी ती विकत घेतली. २००९ ला ती जमीन अन्वय नाईक यांनी विकत घेतली होती. २०१४ ला त्यांनी ती वायकर आणि ठाकरे यांच्या नावावर केली. अन्वय नाईक यांनी जमीन विकली तेव्हा तिथे कुठलीच घरे नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केली.

Check Also

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *