Breaking News

मुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार दरड, भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी

मध्यरात्रीपासून सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गाने चांगलाच आपले आक्राळविक्राळ रूप दाखविले असून भांडूप, विक्रोळी, चेंबूर आदी ठिकाणी दरड, भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जण मृत्यूमुखी पडल्याची तर ४ जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच चांदीवली, पवई येथेही दरड कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. तर वसई-विरार भागात मुसळधार पावसामुळे सर्व भाग जलमय झाल्याचे चित्र पाह्यला मिळत होते.

यापैकी चेंबूरमधील दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व उपनगरात ४ ठिकाणी, पश्चिम उपनगरात ७ ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील भारत नगर बीएआरसी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.

तर विक्रोळीतील पंचशील चाळीतील सुर्यानगर येथे मध्यरात्री २ च्या सुमारास दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भांडूप येथे अमरकुल विद्यालयाच्या जवळ एका चाळीजवळ घराच्या भिंतीचा भाग कोसळला. यात एका १७ वर्षीय मुलाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. पूर्व उपनगरात चांदीवली, पवईतही दरड कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत जीवीतहानी झाली नाही मात्र तीन ते चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या दुर्घटनेचे वृत्त कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. तसेच संभावित पावसाचा अंदाज पाहता मिठी नदीच्या पात्रातील पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता तेथील नागरीकांना स्थलांतरीत करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

या तीन दुर्घटनांमुळे अग्निशामक दल, एनडीआरएफ-एसडीआऱ्एफच्या पथकाला पाठविण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पथकास तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान या दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या वारसांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांचे देणार असल्याची घोषणा केली.

यातील चेंबूर येथील दुर्घटनेचे वृत्त कळताच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. याशिवाय भाजपाचे मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही भेट देत पाहणी केली.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *