Breaking News

संजय राऊत यांचे आईला भावनिक पत्र, महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही

पत्रावाला चाळ पुर्नवसन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांसमोर झुकू शकत नाही असे सांगत जशी तु माझी आई आहेस तशी शिवसेना सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता अशी भावनिक साद घालता सरकार विरूध्द बोलू नका, महागात पडेल अशा धमक्या होत्या. या दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे असे संजय राऊत यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून सांगत आपण लवकरच परत येणार असल्याची ग्वाही दिली.

रविवारी ईडीचे अधिकारी धुसले तेव्हा तू बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची, देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तु करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला. बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनातही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून हात केलास. जसा तू रोज सामनात किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता याची आठवणही त्यांनी आपल्या पत्रात लिहून भावनिक साद घातली.

शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळीस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा ? हा प्रश्न असतोच असेही ते आपल्या पत्रात म्हणाले.

शिवसेनेचे आणि स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेईमानी करायची नाही, हे तुच आमच्या मनावर कोरलेस मग आता मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू ? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झालेले नसते. ईडी, इन्कम टॅक्स वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचे नाही असेही त्यांनी यावेळी आपल्या पत्रात नमूद करत आपली भूमिका स्वतःच्या आईसमोर मांडली.

अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उध्दव ठाकरे हे माझ्या जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू? असा भावनिक सवालही त्यांनी यावेळी केला.

पत्राच्या शेवटी संजय राऊत लिहितात तरीही चिंता नसावी, मी येईनच. तो पर्यंत उध्दव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे असे सांगायलाही ते आपल्या आईला सांगायला विसरले नाहीत.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *