Breaking News

भारत-युके उच्च शिक्षणाच्या संधीचे नवे दालन शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात युके- भारत भागीदारीचे होणार सक्षमीकरण

शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात भारत-युके भागीदारीचे सक्षमीकरणाच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटीश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २१ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता सभागृहात महाराष्ट्र- युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषद पार पडली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारत-युके रोडमॅप २०३० आणि जी-२० नुसार उच्च शिक्षणातील प्राधान्यक्रम अधोरेखित करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. संशोधन व नवीन उपक्रमांना चालना देण्यासाठी युनायटेड किंगडममधील विविध विद्यापीठांसोबत शैक्षणिक सामंजस्यासाठी स्वारस्य राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी दाखविले. परिषदेच्या उदघाटनासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारताचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, भारत, ब्रिटिश कौन्सिलच्या संचालिका एलिसन बॅरेट, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, उच्च शिक्षण संचालक प्रा. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर, ब्रिटीश कौन्सिलच्या भारतातील शैक्षणिक संचालिका रित्तिका चंदा पारुक, पश्चिम भारत, ब्रिटिश कौन्सिलच्या संचालिका राशी जैन यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठातील ३१ विद्यापीठांचे कुलगुरू, युनायटेड किंगडमधील १३ विद्यापीठांचे कुलगुरू आणि उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

उदघाटन सत्रात उपस्थितांना संबोधित करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी म्हणाले की, महाराष्ट्रात उच्च दर्जाची समृध्द शैक्षणिक परिसंस्था आहे. उत्कृष्ट संशोधन सुविधांसह नाविन्यता आणि तंत्रज्ञानाचे उत्तम केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. दोन्ही उभयतांमधील भागीदारी ही ट्रान्सनॅशनल एज्युकेशन (टीएनइ) क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. युनायटेड किंगडम आणि भारत या दोन देशांच्या संबंधांमधील शैक्षणिक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याबरोबर इंडस्ट्री-एकेडमिया आणि जागतिक समंस्यावर एकत्रित उपाय शोधण्यासाठी ही भागीदारी महत्वाची ठरणार असल्याचे दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारताचे उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी सांगितले. तर सध्या महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम मधील संस्था या दोघांमध्ये अनेक भागीदारी सुरु आहेत. या भागीदारी दोन्ही बाजूंकडून उच्च शिक्षणाबाबत असलेला विश्वास आणि सहयोग दर्शवित असून यामुळे उच्च शिक्षणातील भागीदारी संबंध अधिक दृढ होणार असल्याचे ब्रिटिश कौन्सिलच्या संचालिका ॲलिसन बॅरेट यांनी सांगितले.

उदघाटन सत्रानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी ‘संयुक्त पदवीची यशोगाथा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष सादरीकरण केले. यामध्ये विविध ज्ञानशाखा आणि विद्याशाखेतील दुहेरी पदवी, संयुक्त पदवी आणि ट्वीनींग पदवी प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी विशद केली. यानंतर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या सत्रात सोशल सायन्स, लिबरल आर्ट अँड मीडिया, हेल्थकेअर अँड मेडिकल सायन्स या विषयावर आणि दुसऱ्या सत्रात ओपन डिस्टन्स अँड डिजीटल लर्निंग, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंटरडिसीप्लीनरी एरिया या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली असून विविध क्षेत्रात शैक्षणिक सामंजस्य करण्यासाठी विद्यापीठांनी स्वारस्य दाखविले.

या परिषदेमध्ये युके व महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरू संमवेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ‘कंसोर्शियन ऑफ युनिव्हर्सिटीज्’ द्वारे संशोधनासाठी आदान-प्रदान करणे, वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रात शैक्षणिक सामंजस्य करणे, इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, आयओटी अशा अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व विद्यापीठ यांचे साहचर्य घडवून आणणे याबरोबर या परिषदेच्या तार्किक निष्कर्षासाठी एक कार्यगट स्थापन करण्यासाठीही महत्त्वपूर्ण चर्चा या परिषदेत झाली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भल्या पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *