Breaking News

भर उन्हात कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून? उदय सामंत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा करूनच वेळ ठरविली… कार्यक्रमाची वेळ हुकूमशाही पध्दतीने ठरविली नव्हती

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री परिवाराचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आला. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळा सुरु झालेला असताना खारघर येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र हा सोहळा आयोजित केल्यानंतर ऊन वाढत असतानाही हा कार्यक्रम तसाच सुरु ठेवला. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास सुरु झाला. त्यानंतर अनेकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल आणि आज एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यावरून विरोधकांनी केंद्रिय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली. यासंदर्भात आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भर उन्हात कोणाच्या सांगण्यावरून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला याविषयीचा खुलासा केला.

या कार्यक्रमासाठी ६०० मदतनीस होते. १५० नर्स होत्या. ७३ रुग्णवाहिका होत्या. त्यातील ९४ साध्या आणि १९ कार्डिअॅक होत्या. अमरायीमध्ये ४ हजार बेड्सचं हॉस्पिटल तयार केलेलं होतं. एमआयजी, कामोठे, आपोलो, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड राखीव ठेवण्यात आले होते. वैद्यकीय बूथ ठेवण्यात आले होते. तिथे अधिकारी आणि डॉक्टर नेमले होते. रेल्वे स्टेशनवरुन यायला आणि जायला जवळपास १०५० बसेसची व्यवस्था ठेवली होती. बीएमसी, टीएमसी, नवी मुंबई महापालिका, पननेल महापालिका, मीरा भाईंदर महापालिका होत्या. पार्किंगसाठी २१ ठिकाणी व्यवस्था केलेली होती, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचलं. आप्पासाहेबांना बघता यावं यासाठी अनेक श्रीसेवक १४ तारखेपासून यायला सुरुवात झाली होती. ते ज्या श्रद्धेने आणि आस्थेने आले होते ते पाहता त्यांना थांबवणं आणि रोखणं बरोबर नव्हतं. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती दिली.

तसेच उदय सामंत म्हणाले, कालचा प्रकार दुर्देवी आहे. श्रीसदस्य ज्या संख्येने जमले होते त्यांना पाण्यापासून वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय श्रीसदस्यांबरोबरच घेण्यात आला होता. पण दुर्देवाने जी घटना घडली ती उष्माघातामुळे घडली आहे. कार्यक्रम एवढा मोठा होता की, २० ते २२ लाख श्रीसदस्य या कार्यक्रमात सामील झाले होते. प्रशासनाने कुठेही हुकूमशाही करुन राबवलेला नव्हता. तर श्रीसदस्यांसोबत चर्चा करुन हा कार्यक्रम केला होता. पण दुर्देवाने यामध्ये सुद्धा राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहे हे आमचं सगळ्यांचं दुर्देवं आहे. या दुर्घटनेचं समर्थन कुणी करु शकत नाही, असं सामंत म्हणाले.

सरकारवर टीका करण्यात काही लोकं मग्न आहेत. मला त्यांना विनंती वजा सूचना करायची आहे की, ठीक आहे, बाकीच्या वेळी रोज सकाळी साडेनऊ वाजता खोके, गद्दार, असं ऐकतो. पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने शुद्ध आणि पारदर्शकपणाने आयोजित केला होता, आप्पासाहेबांसारखे सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना बघण्यासाठी लाखो लोक आली. त्यांच्यासोबत अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं मला योग्य वाटत नाही. अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. पण कुठल्याही प्रंसगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठलाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, यातून बाहेर येऊन मोठ्या मनाने सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणे गरजेचं आहे. एक कलमी टीका करणं यापेक्षा या बद्दलची अजून काही सूचना असतील तर त्या सूचना सरकारला देण्यात काही प्रोब्लेम नाही, असं सामंत विरोधकांना उद्देशून म्हणाले.

यावेळी उदय सामंत म्हणाले, मृतकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकार ५ लाखांची मदत करणार आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. फक्त एकच विनंती या कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कुणी करु नये. अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण निर्माण करु नका. तर महाराष्ट्राची संस्कृती जपून एकत्र येऊन काम करुयात, असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. तसेच कार्यक्रमासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या विषयी प्रश्न विचारला असता, खर्च किती झाला हे सगळं आम्ही प्रशासनामार्फत जाहीर करु. ते मैदान ३८० एकरचं होतं. तिथे सुविधा देणं, जागा सपाटीकरण करणं, या सगळ्याला जो खर्च आलाय त्याबाबत माहिती दिली जाईल. पण प्रत्येक गोष्टीत शंका आणि संभ्रम निर्माण करणं चुकीचं आहे, असे स्पष्टीकरणही सामंत यांनी दिले.

यावेळी उदय सामंत यांना कार्यक्रमाची वेळ दुपार ऐवजी संध्याकाळी का ठेवली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही सामंत यांनी भूमिका मांडली. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *