Breaking News

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येईल असेही सांगितले.

दरम्यान, पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्ध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘पेण मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी राज्य असल्याची जाहिरात करतो. पण सर्पदंशावरील साधे इंजेक्शन, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध ठेवण्याचे सक्तीचे आदेश असतात. पण सरकारच्या दुर्लक्षामुळे या रूग्णालयांना मिळालेला हा कोटा काळ्या बाजारात विक्री केला जातो आणि सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. या दुर्देवी घटनेतील मुलगी कु. सारा रमेश ठाकूर ही केवळ १२ वर्षाची होती, सातवीच्या वर्गात शिकत होती. सर्पदंशानंतर तिला तत्काळ पेण उप जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचाराची साधने नसल्याचे कारण देत तिच्यावर उपचार न करता परत पाठवले. वास्तविक पेण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन या मुलीचा जीव वाचविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी उपचारास नकार दिला ही अक्षम्य चूक आहे. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेले तिथून तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देऊन उपचार नाकारला, इतकी भयंकर व लाजिरवाणी घटना घडलेली आहे. तिचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही तर सरकारी अनास्थेमुळे, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे झाला आहे, असा आरोप केला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही या चर्चेत भाग घेताना म्हणाले, सर्पदंश झाल्यानंतर खाजगी रूग्णालयात दाखल केले जाते. तेथे रूग्णाला आयसीयू आणि व्हेटींलेटरवर ठेवले जाते. तसेच त्याशी संबधित औषधेही दिली जातात. मात्र या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यात नसतो. त्यामुळे महात्मा फुले योजनेतून हा ही खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्पदंशाचाही समावेश महात्मा फुले जनआरोग्य या योजनेत समाविष्ट करावा असे निर्देश दिले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *