Breaking News

राज्यातील २ कोटी ८० लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सरकारकडून मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे दोन कोटी ७१ लाख ४८ हजार ५०२ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९ टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात’राष्ट्रीय जंतनाशक दिन’ वर्षातून दोनदा राबविण्यात येत  आहे. जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्ताक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

हत्तीरोगग्रासित जिल्हे (गोंदीया, चंद्रपुर, नांदेड आणि चंद्रपुर व नांदेड महानगरपालिका) वगळता इतर जिल्हे व मनपा येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी शाळा व अंगणवाडी या संस्था विशेष भूमिका बजावणार आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका व सर्व खाजगी अनुदानित शाळा त्याचबरोबर सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अल्बेंडोझॉल ही कृमिनाशक गोळी घेण्याची पद्धत प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे. आजारी बालकांना जंतांनाशकाची गोळी देऊ नये, जंतनाशकाची गोळी लहान मुलांना तशीच गिळण्यासाठी सांगू नये व गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये जेणेकरुन  या मोहिमेंतर्गत बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

अल्बेंडोझॉल ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे. जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंतसंसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. ते तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. जंतनाशक गोळी मुलांना दिल्यानंतर अशी लक्षणे निदर्शनास आल्यास ताबडतोब १०४ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. तीव्र स्वरूपाचे दुष्परिणाम दिसून आल्यास तात्काळ मोहीम थांबवावी व विद्यार्थ्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा ग्रामीण रुग्णालयात संदर्भीत करावे अशी सूचना आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना केलेल्या आहेत.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगतील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले. वैयक्तीक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तशयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले हि नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ ही खुंटत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *