Breaking News

४७ हजार मजुरांच्या मानसिक स्वास्थासाठी आरोग्य विभागाचा असाही पुढाकार ९४४ शिबीरात मानसिक समुपदेशन

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांचे मानसिक आरोग्य स्वस्थ रहावे यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आधीच रोजगार बंद, घरच्यांपासून दूर आणि आर्थिक अडचणीमुळे या कामगारांना मानसिक अनारोग्याला सामोरे जावे लागत असल्याने विभागाने पुढाकार घेतला.
सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच जोडीला त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत राज्यभर सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४७ हजार स्थलांतरित मजूरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचेही समुपदेशन केले जात आहे.
घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भिती यामुळे या मजूरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागते. यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे या स्थलांतरित मजूरांना समुपदेशन देण्याचे काम राज्यात सुरु आहे.
मजूरांमध्ये समुपदेशनाचा विधायक परिणाम- आरोग्यमंत्री टोपे
कोरोनाची सोप्या भाषेत माहिती, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करु नये याबाबत या मजूरांना माहिती देण्यात येत आहे. राज्यातील समुपदेशक, मनोविकार तज्ञ आणि मनोविकार परिचारिका यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. या समुपदेशनाचा विधायक परिणाम मजूर वर्गामध्ये दिसत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ३० समुपदेशक, २८ मनोविकार तज्ज्ञ, ३६ मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून हे काम केल जात आहे. या तिघांच पथक जाऊन समुपदेशनाच काम करतंय. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: दोन ते तीन पथक आहेत. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून यापथकाद्वारे प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात समुपदेशनाचे काम केले जाते. तसेच गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांनाही समुपदेशनाचं काम या पथकामार्फत करण्यात आलं होतं.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *