कोरोना कालावधीनंतर सातत्याने देशात महागाई सातत्याने वाढत आहे. बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच आता जीवनाश्वक वस्तुंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे काही वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. तर काही वस्तुंच्या किंमती आहे तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या आकारमानात वजनात कंपन्यांनी घट केली आहे. यापार्श्वभूमीवर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मागील दहा वर्षांतील उच्चांकी आहे.
मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक १३.११ टक्क्यांवर होता. तर मार्चमध्ये हाच निर्देशांक १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.७४ टक्के इतका होता. विशेष म्हणजे मागील १३ महिन्यांपासून घाऊक महागाई दर दोन अंकी नोंदला आहे. त्यामुळे देशात महागाईचं संकट किती भीषण रुप घेत आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल महिन्यात महागाई दर वाढला असल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर ८.३५ टक्के नोंदला आहे. हाच दर मार्च महिन्यात ८.०६ टक्के इतका होता. भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने खाद्यपदार्थांवरील महागाई दर वाढला असल्याचं संबंधित अहवालात सांगण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर २३.२४ टक्के नोंदला आहे, हा दर मार्चमध्ये १९.८८ टक्के इतका होता. एप्रिल महिन्यात बटाट्याचे भाव १९.८४ टक्क्यांनी वाढले तर कांद्याचे भाव ४.०२ टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच फळांचा महागाई दर मार्चमध्ये १०.६२ टक्के होता. एप्रिलमध्ये हा दर १०.८९ टक्क्यांपर्यंत वाढला. दुसरीकडे, गव्हाच्या किंमतीत देखील १०.७० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. तसेच अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीतही ४.५० टक्क्यांची वाढ नोंदली आहे.
इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई दरात ३८.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्के होता. दरम्यानच्या काळात एलपीजी गॅसच्या किमतीत देखील ३८.४८ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंदही मंत्रालयाच्या अहवाला देण्यात आली आहे.
