Breaking News

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई (व्हिसीद्वारे), उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (व्हिसीद्वारे), अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने साडे पाच हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले. उद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्नात महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्वाचे साधन आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढताना या निर्देशांकाचा उपयोग होतो. या निर्देशांकाचा उपयोग करुन आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू आणि राबवू शकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या धोरणांचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच, उद्योग आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्राची प्रगती समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक निर्देशांक वेबसाईटचा मोठा उपयोग होणार आहे. या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राचे निश्चित स्थान आपल्याला समजणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे उद्योग विभागाचे अधिकारी आवश्यक माहिती या वेब पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम करणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या  प्रगतीसाठी आणि उत्पादनांच्या नियोजनासाठी ही वेब पोर्टल उपयुक्त ठरेल.

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्यातील उद्योग तसेच सांख्यिकी विभागाचे अधिकारी, उद्योजकांचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *