Breaking News

ऋषिकेश बनला वेडगावचा शहाणा ‘वाघेऱ्या‘ या अनोखा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी

गावरान भूमिकांमध्ये विनोदी रंग भरताना कुठेही लाल मातीचा सुगंध हरवू न देता त्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या ऋषिकेश जोशीने आजवर साकारलेल्या सर्वच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. प्रेक्षक जेव्हा एखाद्या कलाकाराला सिनेमातील नावाने ओळखू लागतो तेव्हा त्या कलावंताने साकारलेल्या भूमिकेचं चीज झालं असं म्हटलं जातं. ऋषिकेशने आजवर साकारलेल्या बऱ्याच भूमिकांच्या बाबतीत असं घडलं आहे. आता तो वेडगावचा शहाणा अधिकारी बनलेला दिसणार आहे.

‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमात प्रेक्षकांना ऋषिकेशचं हे नवं रूप पाहायला मिळेल. ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव’ अशी भन्नाट टेगलाईन असल्याने ‘वाघेऱ्या’ या सिनेमात काही तरी भन्नाट पाहायला मिळणार याची कल्पना येतेच. याच गावात ऋषिकेश पुरता अडकला आहे! धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून, ‘वाघेऱ्या’ नामक वेड्यांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू हास्याची खुमासदार मेजवानी ठरणारा आहे.

लग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या, एका नवविवाहित तरुणाची कैफियत यात  ऋषिकेश मांडणार आहे. आतापर्यंत सदरा, झब्बा तसेच पायजमामध्ये दिसणारा ऋषिकेश या सिनेमात मात्र शहरी बाबूच्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण जीवनातील हलके फुलके विनोद मांडणाऱ्या या सिनेमात ऋषिकेशबरोबरच, किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘बॉईज’सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या ‘वाघेऱ्या’ची निर्मिती गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांनी केली आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *