Breaking News

रुपेरी पडद्यावर येतोय ‘तेंडल्या’ क्रिकेट चाहत्याची आपल्या आवडत्या खेळाडूवरील प्रेमापोटी बनविला चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी

चाहते… मग ते कलाकारांचे असोत, वा खेळाडूंचे… चाहते हे चाहतेच असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी एखादा चाहता कधी काय करेल याचा नेम नाही. क्रिकेटमधील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरचे चाहते तर जगभर पसरले आहेत. सचिन आजही इतका लोकप्रिय आहे की, क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. सचिनचे काही चाहते त्याला प्रेमाने तेंडल्यादेखील म्हणतात. याच तेंडल्याच्या प्रेमात असलेल्या सचिनच्या एका चाहत्याने त्याच्यावरील प्रेमाखातर चक्क मराठी सिनेमाच बनवला आहे. या सिनेमाचं शीर्षकही त्याने ‘तेंडल्या’ ठेवलं आहे.

सचिनप्रती असणाऱ्या प्रेमापोटी सचिन जाधव या चाहत्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने ‘तेंडल्या’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जाधव यांनी स्वत:च या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. याशिवाय पटकथा आणि संवादलेखनही त्यांचंच आहे. क्रिकेट, सचिनप्रेम आणि ग्रामीण भागतील सामान्यांचं जीवन वास्तवदर्शी पद्धतीने रेखाटणारा ‘तेंडल्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण जेष्ठ क्रीडा पत्रकार आणि समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. या सिनेमाविषयी बोलताना जाधव म्हणाले की, भारतीय क्रिकेट रसिकांचा नायक सचिन तेंडुलकर यांच्यासाठी चाहत्यांनी निरनिराळ्या प्रकारांतून त्यांच्याबद्दलेचे आपले प्रेम व्यक्त केले आहे तसेच आम्ही आमच्या आयुष्यातील सचिनचे स्थान अधोरेखित करत सचिनच्या चाहत्यांविषयी ‘तेंडल्या’मध्ये भाष्य केलं असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे.

“आमच्या चित्रपटातील पात्रे अज्याबात काल्पनिक नाहीत, लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय… अख्या ऑल इंडियात जिवंत आसू द्यात की मेलेलं आसू द्या… त्याच्यासंग योगा योगान नव्हं… तर ओढून ताणून आणलं तरी बी संबंध जुळणार नाय” अशा विनोदी शैलीतील डिस्क्लेमर आणि आबालवृद्धांमध्ये खेळला जाणारा क्रिकेट आणि क्रिकेटवरील प्रेम अतिशय वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात दाखवला आहे. नचिकेत वाईकर या सिनेमाचे सहदिग्दर्शक आहेत. अश्वमेध मोशन पिक्चर्स निर्मित ‘तेंडल्या’चं छायांकन बाळकृष्ण शर्मा यांनी केलं आहे, तर चैतन्य काळे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *