Breaking News

कोण घेणार स्पृहाची जागा? ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकात नवी अभिनेत्री पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

काही मालिकांमध्ये काळानुरूप बदल होत असल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. नाटकही याला अपवाद नाही. एखाद्या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा कलावंत दुसऱ्या एखाद्या कामात गुंतला की त्याची जागा अन्य एखादा कलावंत घेतो आणि ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नव्या टिमसोबत नाटकाची वाटचाल पुढे सुरूच राहते. चित्रपटांपासून मालिकांपर्यंत नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री स्पृहा जोशी मागील काही दिवसांपासून रंगभूमीवर रमलीय. स्पृहाची मुख्य भूमिका असलेल्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाला नाट्यप्रेमींनीही पसंती दर्शवली आहे, पण आता या नाटकात तिची जागा अन्य कोणती तरी अभिनेत्री घेणार आहे.

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात स्पृहाची जोडी उमेश कामतसोबत जमली आहे. ही जोडी प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे कामदेखील करीत आहे.

उमेश-स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना ‘हॅप्पी’ करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे. आजच्या पिढीतील नवरा-बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील ‘प्रणोती’ एका नव्या रुपात रसिकांसमोर येणार आहे. स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे. ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार असून, चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील हे नाटक आहे. आजदेखील हे नाटक जोरात चालत असल्यामुळे, नाटकातील हा महत्वपूर्ण बदल नाट्यरसिकांना अचंबित करणारा आहे.

या नाटकातील बदलाविषयी स्वतः स्पृहाने आपल्या सोशल नेट्वर्किंग साईटवर माहिती दिली आहे. ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. मात्र काही इतर कमिट्मेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंड चालू राहील असा मला विश्वास आहे.  सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नवरा-बायकोच्या नात्याची व्याख्या आणि विचार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, हा प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या नाटकाला प्रेक्षकांची अशीच भरभरून साथ लाभो ही सदिच्छाही स्पृहाने दिली आहे. आता स्पृहाची जागा कोणती अभिनेत्री घेते याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *