Breaking News

टीझरने उलगडला ‘रेडू’चा अर्थ मे महिन्यात मिळणार बघायला

मुंबई : प्रतिनिधी

काही सिनेमे अनोख्या शीर्षकांमुळे चर्चेत राहतात आणि उत्सुकताही वाढवतात. शीर्षकाचाच नेमका अर्थ न समजल्याने सिनेमात काय दडलंय याचाही अंदाज येत नाही, पण असे सिनेमे कुतूहल जागविण्यात यशस्वी ठरतात. ‘रेडू’ या आगामी मराठी सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. शीर्षकावरून हा सिनेमा कसा असावा याचा अंदाज लावणं तर सोडाच पण हे शीर्षक तरी नेकमं कोणाला उद्देशून ठेवण्यात आलंय याचा पत्ता लागत नाही. आजवर अबाधित असलेलं हे रहस्य उलगडण्याचं काम ‘रेडू’च्या पहिल्या टीझर पोस्टरने केलं आहे.

या सिनेमात रेड्याला रेडू म्हटलं असेल का… किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न या हटके नावामुळे पडत आहे. ‘रेडू’च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा ‘रेडू स्टेडू गो’ असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील ‘रेडू’ एक प्राण्याचं नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला रेडा म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर अमेय वाघने थेट ‘रेडीमेड’ आणि ‘ड्युप्लेक्स’ला एकत्र करत ‘रेडू’ असा निष्कर्ष काढला. खरं तर यांपैकी कोणालाच ‘रेडू’चा नेमका अर्थ सांगता आला नाही. ‘रेडू’ या शीर्षकाविषयी कलाकारांनी केलेल्या या भन्नाट तर्कवितर्कानंतर, अखेरीस ‘रेडू’चा खरा अर्थ या सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे स्पष्ट करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरमध्ये रेडियो दिसत असल्यामुळे, ‘रेडू’ म्हणजेच ‘रेडियो’ हे लोकांना समजलं आहे.

‘रेडू’ या सिनेमातील टीझर पोस्टरवर रेडियोचा चेहरा असलेला एक माणूस चालताना दिसून येतो. जुन्या काळातला आकाशवाणी संच यात पाहायला मिळत असल्यामुळे, एका रेडियोची गमतीदार गोष्ट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हा टीझर पोस्टर पाहताना येतो. शिवाय यात मालवणी भाषादेखील आपल्याला ऐकू येत असल्यामुळे, रेडीयोच्या माध्यमातून मालवणी मनोरंजाचा तडकादेखील यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवल सारडा यांच्या सौजन्याने ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *