Breaking News

‘बबन’ सिनेमावरचं ‘मेकिंग ऑफ बबन’ प्रदर्शनापूर्वीच प्रकाशित झालं सिनेमाच्या मेकिंगचं पुस्तक

मुंबई : प्रतिनिधी

दिग्दर्शकाने एखादा सिनेमा बनवावा… तो बॅाक्स ऑफिसवर तूफान चालावा… जगभरात त्याची चर्चा व्हावी… आणि मग तो सिनेमा कशा प्रकारे बनला यावर आधारित एखादं पुस्तक यावं… हे आजवर हिंदीसिनेसृष्टीत पाहायला मिळालं आहे. याच वाटेने जात मराठी सिनेसृष्टीतही सिनेमा मेकिंगवर आधारित पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत, पण ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी ‘बबन’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘मेकिंग ऑफ बबन’ हे या सिनेमाच्या जन्माची कथा सांगणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमाच्या जडणघडणीचा अखंड लेखाजोखा मांडणारं ‘मेकिंग ऑफ बबन’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. पत्रकार मंदार जोशी संपादित (तारांगण प्रकाशन) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील प्रकाशन नॅशनल फिल्म अर्काईव्हमध्ये समर नखाते यांच्या हस्ते पार पडला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला दिग्दर्शक सुजय डहाके, उद्योजक मा. कल्याण तावरे, डॅा. अशोक देवीकर, कवी देवा झींजाड आणि सेवानिवृत्त प्राचार्य विवेक जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. भाऊराव कऱ्हाडे लिखीत, दिग्दर्शित ‘बबन’ हा सिनेमा २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची संपूर्ण घडण या पुस्तकामध्ये मांडण्यात आली आहे.

‘मेकिंग ऑफ बबन’ या पुस्तकात ‘बबन’ सिनेमातील सर्व कलाकारांचे अनुभव आणि निवेदन मांडण्यात आलं आहे. एका ग्रामीण तरुणाच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलीशी करणारी असल्याचं भाऊराव कऱ्हाडे यांचं म्हणणं आहे. या सिनेमात भाऊसाहेब शिंदे प्रमुख भूमिकेत असून, त्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने भाऊराव कऱ्हाडे आणि अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी ‘बबन’ची निर्मिती केली आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *