मुंबईः प्रतिनिधी
गोष्ट तशी जुनीच परंतु कधीकाळी आपणही लहान असताना वॉल्ट डिस्नेच्या “अलादीन” च्या कार्टुनची भूरळ ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर पडली होती. त्यावर चित्रपटही डिस्नेने प्रदर्शित केल्यानंतर त्याकाळीही अबालवृध्दांच्या उड्या पडल्या.
त्याच बालमनाचा आणि प्रत्येकात लपलेल्या निरागस बालमनाला खुष करण्यासाठी रत्नाकर मतकरी यांनी मराठीत निम्मा शिम्मा राक्षस नावाचे बालनाट्य लिहीले. या नाटकाला बालनाट्य म्हणावे की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण या नाटकाच्या प्रयोगाला लहानग्यांबरोबरच त्यांचे आलेले पालकही तितक्याच तन्मतेने नाटकातील मयुरेश पेमच्या अब्दुल्ला या व्यक्तीरेखेच्या एक नंबर या संवादाला जल्लोषात प्रतिसाद देताना एक वेगळेच थोरांच्या मनातील बालमन पाह्यला मिळत होते.
ईसापनीतीतील किंवा अरब नाईट्स मधील अलादीनची गोष्टी आतापर्यंत अनेकवेळा आपण घरातील आजी-आजोबा, आई-वडीलांच्या तोंडून ऐकली. त्यानंतर हा चित्रपट आल्यावर तो पाहून त्याचा आनंदही त्यावेळच्या तमाम प्रेक्षकांनी घेतला. परंतु आताच्या मोबाईलच्या खेळात मग्न झालेल्या बाल मनाला अशा कथा हलक्या-फुलक्या आणि त्यांच्याच मनाला भावेल अशा पध्दतीने पुन्हा पडद्यावर किंवा नाट्यकथेतून दाखविणे तसे एक आव्हानच होते. मात्र रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या लेखनातून सहजरीत्या पेलल्याचे दिसते.
त्यामुळे रंगमंचावर या नाटकाचा पडदा उघडल्यापासूनच नाट्यगृहात उपस्थित असलेल्या बच्चे कंपनीला आणि त्यांच्या पालकांना नाटकात समाविष्ट करून घेण्याचा प्रकार आजच्या परिस्थितीतील नाटकात तरी पहिल्यांदाच होताना दिसला.
मयुरेश पेमने अब्दुल्ला व्यक्तीरेखा साकारताना त्याचे खरे वय जास्त असतानाही बालमनाची निरागसता त्यांने चांगलीच आपल्या अभिनयातून चांगलीच बाल प्रेक्षकांच्या मनावर उतरविली. त्याचाच परिपाक म्हणून कदाचीत त्याच्या एक नंबर या संवादाला प्रत्येकवेळी बच्चे कंपनींकडून प्रतिसाद मिळत राहीला.
रंगमंचावर निम्मा राक्षस अर्थात अंकुरचे आगमनच मोठ्या दमदार पध्दतीने दाखविण्यात आले. त्यात तो राक्षस असूनही त्याची उंची कमी असल्याने त्याने साकारलेला राक्षस हा बच्चे कंपनीतील राक्षस वाटला. मात्र जरी त्याची उंची कमी असली तरी त्याच्या अभिनयातील उंची चांगलीच असल्याचे जाणवले.
कथा तशी जुनीच असूनही दोन-अडीच तास बच्चे कंपनीला आणि त्यांच्या पालकांना खिळवून ठेवण्यात निम्मा शिम्मा राक्षस यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
