Breaking News

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार

अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कविता संग्रहास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाच्या कवयत्री विशाखा विश्वानाथ यांनी स्वीकारला.

साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार २०२३ चा प्रदान सोहळा रवींद्र सदन सभागृह, हेरासिम लेबेदेव सरानी, कोलकाता येथे झाला. यावेळी प्रसिद्ध बंगाली कवी, संपादक, निबंधकार आणि अनुवादक सुबोध सरकार,अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वर्ष २०२३ च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी २० प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली. यामध्ये जिंटु गीतार्थ (आसामी), हमीरद्दीन मिद्या (बाड्:ला), माइनावस्त्रित दैमारि (बोडो), धीरज बिस्मिल (डोगरी), अनिरुध्द कानिसेट्टी (इंग्रजी), सागर शाह (गुजराती), अतुल कुमार राय (हिंदी), मंजुनायक चळ्ळूरु (कन्नड), निगहत नसरीन (कश्मीरी) तन्वी बांबोळकार (कोंकणी), गणेश पुथुर (मल्याळम), विशाखा विश्वनाथ (मराठी), नैना अधिकारी (नेपाळी),संदीप (पंजाबी), देवीलाल महिया (राजस्थानी), बापी टुडू (संथाली), मोनिका पजंवानी (सिंधी), राम थंगम (तमिळ), जॉनी तक्केदासिया (तेलुगु) आणि जहन जाद (उर्दू) यांचा समावेश आहे. पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि ५० हजार रूपये रोख असे आहे.मराठी भाषेतील पुरस्कार निवड समितीत ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.

‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या काव्यसंग्रहाविषयी

विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. ८६ कविता असणाऱ्या त्यांचा हा संग्रह गमभन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत:सोबत भांडण करत स्वत: वर प्रेमकरण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. या कवितांचा विषय प्रामुख्याने आत्मशोध आणि आत्मस्वीकार आहे. कवयित्री स्वत:च्यातील विरोधाभास, अपूर्णता आणि कमतरता यांचा वेध घेतात. त्या स्वत:ला समजून घेण्याचा आणि स्वत:वर प्रेम करण्याचा प्रयत्न करतात.

या कवितांची भाषाशैली सरळ आणि सोपी आहे. कवयित्रींची भावना प्रामाणिकपणे व्यक्त झाली आहेत. कवितासंग्रहातील कविता वाचून वाचकांना स्वत:तील भावना समजून घेण्यास आणि स्वत:वर प्रेम करण्यास प्रेरणा मिळते.

विशाखा विश्वनाथ यांच्याविषयी

विशाखा विश्वनाथ या मूळच्या खान्देशातील रहिवासी आहे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झाला. विशाखा विश्वनाथ यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. त्यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटिंगमध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या ५० नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटिंग आणि कॉपीरायटिंग त्यांनी केलेले आहे.

Check Also

Aamir Khan : अमिर खान व विष्णू विशाल अडकले चेन्नईच्या पुरात

Aamir Khan  : अभिनेता अमित खान आणि विष्णू विशाल तामिळनाडूच्या चेन्नईत आलेल्या पुरात अडकले होते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *