डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गुगल आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक भावपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘देवा देवा’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभला आहे. आयुष्यातील संघर्ष आणि मनातील घालमेल व्यक्त करणाऱ्या या गाण्याला एस. सागर यांनी शब्दबद्ध केले असून संगीतही त्यांचेच लाभले आहे.
प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, आणि सई रेवडीकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. तिघेही परिस्थितीशी झुंज देत असताना परमेश्वराला दिलेली साद या गाण्यात दिसत आहे. मनात रुजणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्की भावेल. दरम्यान, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटांशी सामना करत कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट आहे.
या चित्रपटातील गाण्यांबद्दल दिग्दर्शक म्हणतात, ” काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. या गाण्याला संगीतप्रेमींनी पसंती दर्शवली. आता या चित्रपटातील भावनिक गाणे प्रदर्शित झाले असून मनाला भिडणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते सारख्या नामवंत गायकाचा आवाज लाभला आहे. एस. सागर यांच्या शब्दांनी आणि संगीताने या गाण्यात एक अनोखी आर्तता आणली आहे. या गाण्याला थोडा कव्वालीचा फील देण्यात आला आहे, त्यामुळे हे गाणे अधिकच श्रवणीय झाले आहे. मला खात्री आहे हे गाणेही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
या सिनेमात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, सई रेवडीकर यांच्यासह माधव अभ्यंकर, अश्विनी कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘गुगल आई’ या चित्रपटाचे निर्माते डॉलर दिवाकर रेड्डी आहेत. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा लेखन केले आहे. येत्या २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.