Breaking News

कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम

महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्याचसोबत, वृध्द कलावंतांच्या पेन्शन योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. यावेळी मंत्री मुनगुंटीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, हे सर्व कलावंत आणि त्यांची कला ही अनेक पिढ्यांचे समाधान करत आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची प्रथा, परंपरा आहे. आपला देश संस्कृतीप्रधान आहे, एखाद्याच्या योगदानाचे मनापासून कौतुक करणे, त्याला दाद देण्यासाठी विशाल हृदय लागते. महाराष्ट्र शासनाने ही सहृदयता जपली आहे. आपल्या मराठी माणसाचं आपण कौतुक करणं यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी मान्यता आणि कृतज्ञता दर्शविणारा हा सोहळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अभिनय, लेखन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, दिग्दर्शन या विविधांगी कलांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे.

समर्पित भावनेने काम करणाऱ्या वृद्ध कलावंतांना राज्य शासन मदत करते. त्यासाठी असणारी वयोमर्यादा आपण ५० वर्षे इतकी ठेवली. या वृध्द कलावंतांच्या पेन्शन मध्येही आपण लवकरच वाढ करीत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात ७५ चित्र नाट्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, महासंस्कृती उत्सव घेतला. रसिकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी यामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना भरभरुन दाद दिली. राज्यात सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी तयार केलेली समिती काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना प्रधान सचिव खारगे म्हणाले, महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे.

राज्याबाहेर जाऊनही आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत. दरवर्षी तीन मराठी चित्रपट कान्स फिल्म महोत्सवासाठी पाठवतो. पुरी ते पंढरपूर हा ओडिशा राज्यासोबत आपण कार्यक्रम करत आहोत. इतर राज्यासोबत आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत. यावर्षी राज्याच्या सर्व जिल्ह्यात पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव आयोजित केला आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार रक्कम यावर्षीपासून तीन लाख रुपये तर जीवनगौरव पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

यामध्ये, यावेळी सन २०२३ साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन २०२२ साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन २०२३ साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळे, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२२ साठी सुहासिनी देशपांडे आणि सन २०२३ साठी अशोक समेळ, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२२ साठी नयना आपटे आणि सन २०२३ साठी पं. मकरंद कुंडले, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन २०२१ साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन २०२२ साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात आला.

तसेच सन २०२२ आणि सन २०२३ साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान करण्यात आले. सन २०२२ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये वंदना गुप्ते (नाटक), मोरेश्वर अमृतराव निस्ताने (उपशास्त्रीय संगीत), अपर्णा मयेकर (कंठसंगीत), हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला), शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी), लता सुरेंद्र (नृत्य), चेतन दळवी (चित्रपट), प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन), पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत), डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान), अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले. श्रीमती गुप्ते यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

सन २०२३ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक), पं.ह्रषिकेश बोडस (उपशास्त्रीय संगीत), रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत), कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला), शाहीर राजू राऊते (शाहिरी), सदानंद राणे (नृत्य), निशिगंधा वाड (चित्रपट), अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन), शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत), यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान), उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक चवरे यांनी केले, तर आभार सहसंचालक श्रीराम पांडे यांनी मानले.

Check Also

Aamir Khan : अमिर खान व विष्णू विशाल अडकले चेन्नईच्या पुरात

Aamir Khan  : अभिनेता अमित खान आणि विष्णू विशाल तामिळनाडूच्या चेन्नईत आलेल्या पुरात अडकले होते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *