Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदीच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी

देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. उद्योगाबरोबरच, पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. यासाठी केंद्र शासनाचा नियमित पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या सहा मार्गिकांच्या समुद्रावरील भारतातील सर्वांत लांब सागरी सेतूला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणेच मजबूत आणि अटल आहे. अटलजींचे नाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी आहे. या सागरी सेतूमध्ये कोणत्याही मोठ्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता आहे. आज देशातील पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. राज्यात सुमारे ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट वेगाने प्रगती करत आहे. मागील नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत, तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९७३ मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती. मात्र ४० वर्षात हे काम झाले नाही, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी पंतप्रधान यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या २५ वर्षांत देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला रायगडचा परिसर ताकद देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. ६५ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे.

मुंबईत कुठूनही ५९ मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईल”, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी जनतेला सांगितले. यापुढे रायगड, नवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुधारणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले आहे. उज्वला योजना ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे. यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात कटीबद्ध असल्याचे सांगून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा निर्धारही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

अटल सेतू’ शनिवारी सकाळी खुला होणार..!

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा ‘अटल सेतू’ शनिवार १३ जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *