Breaking News

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी २८२ पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री अतुल सावे म्हणाले की, सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात ५२ वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ६०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता ५० वरून ७५ इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *