Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, ज्याला स्वत:च भविष्य माहित नाही तो आपलं भविष्य ठरविणार

आपला नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करत म्हणाले की, काल परवा ते स्वत:च भविष्य बघायला हात दाखवायला गेले. आज काय तर म्हणे गुवाहाटीला नवस फेडायला गेले. त्यांना त्यांचे भविष्य माहित नाही ते काय आपलं भविष्य घडविणार अशी उपरोधिक टीका केली.

शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रवक्ते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मराठी मातीतील गद्दारी असा उल्लेख करत बंडखोर शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचे मत व्यक्त केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, दसऱ्याचा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर झाला. तो प्रचंड मोठा झाला. तेव्हाच मी ठरवलं होतं की शिवतीर्थापासून सुरुवात केल्यावर मुंबईच्या बाहेर माझी जी पहिली सभा होईल ती जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या माझ्या बुलढाण्यात घेईल. कारण ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघालं पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे.

आज संविधान दिन आहे. या दिवशी हे संविधान सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. चार-पाच दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आलो होतो. तेव्हा त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. संविधान सुरक्षित आहे का हाच प्रश्न माझ्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात असायला हवा. कारण पुढील वाटचाल आपल्याला त्याच दिशेने करावी लागणार असल्याचा सूचक इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावरच शपथ घेतली आणि पहिल्यांदा आमची कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनला गेलो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो.

हे आज तिकडे गुवाहटीला नवस फेडायला गेले आहेत. गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यांची हातसफाई आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. तेच तुमचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, असं म्हणत शिंदे गटाला टोले लगावले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Marathi e-Batmya

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading