Breaking News

संजय राऊत यांचा खोचक सवाल, महाराष्ट्राचे देव संपले का?

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेकडून बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याचा चांगलाच समाचार घेत म्हणाले, मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत खोचक शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले.

आज समोर पेटलेल्या मशाली आहेत. या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. आज ही भूमी जिजाऊंची भूमी आहे. ज्या मातेने आम्हाला शिवाजी राजा दिला. त्या भूमीत आज गद्दारांची बीज रोवली गेली आहेत. ती बीज कायमची नष्ट करण्यासाठी या मशाली पेटल्या आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहेत. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गुवाहाटीला गेले, असेही ते म्हणाले.

हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजुला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मगाशी अरविंद सावंत यांनी तुरुंगाचा उल्लेख केला, शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी १०० दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार आहे. ज्या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक जीवाची बाजी लावायला तयार असतात, त्या शिवसेनेसाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तरी काहीही होणार नाही. आमच्यावर कितीही अत्याचार केले, तरी लाखो शिवसैनिक असे मोडून विकत घेता येणार नाही, असेही ते म्हणाले.

आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी आपले भारतीय संविधान अस्तित्वात आले होते. मात्र, आज राज्य बेकायदेशीपणे चालवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही. एक बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसवले आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे, असे सांगत संजय राऊत म्हणाले, मी जवळजवळ ११० दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा दुपट्टा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवे, शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तेव्हाच आपण स्वत:ला शिवसैनिक म्हणू शकू.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *