Breaking News

उध्दव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ ऐकवित म्हणाले, आता करून दाखवा

बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ उपस्थित जनसमुदायाला ऐकवित थेट आव्हान दिले. त्यावेळी मी तिकडे होतो, त्यावेळी तुम्ही इकडे होतात. आता मी इकडे आणि तुम्ही तिकडे आहात त्यामुळे तुम्ही एकदा करून दाखवाच आणि मध्य प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांची वीज माफी करू दाखवा असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना देत देवेंद्र जरा मनाची नाही तरी जनाची लाज बाळगा असा खोचक टोला लगावला.

तसेच उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला.

चिखली येथील सभेत बोलताना मी एक तुम्हाला व्हिडिओ एकवितो असे उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ ऐकविला. तो व्हिडिओ एकविल्यानंतर त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाज ओळखला का? असा सवाल करत म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना हे विरोधी पक्षात होते. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकऱ्यांची वीज बील माफी केली म्हणून राज्यात पेढे वाटले. आता तुम्हा शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळते का? वीज बिलाची वसूली सुरू आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यास जनसमुदायाने उत्तर दिल्यानंतर ते म्हणाले, मग आता तुम्ही तिकडे आहात आणि आम्ही इकडे आहोत. आता करून दाखवा ना असे आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले.

भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा हा आता आयात पक्ष झाला आहे. हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:कडे काहीच शिल्लक राहील नाही, म्हणून ते सगळं बाहेरून चोरून घेत आहेत. त्यामुळे मी ४० रेडे किंवा ४० गद्दारांना प्रश्न विचारतोय की, त्यांच्यामध्ये अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की, ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही. मिंधे गटाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे, आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे, मग तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल केला.

बुलढाणा हे जिजामातेचं जन्मस्थान आहे, शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण आपल्या छत्रपतींचा सातत्याने अपमान केला जात आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी तिकडे वळवले जात आहेत. कारण त्यांना गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. काल-परवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईही बोंबलेत. त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोटवर आपला हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्येही निवडणुका आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राचेही तुकडे करायला मागे-पुढे बघणार नाहीत. तेव्हा आपले मिंधे मुख्यमंत्री शेपूट आत घालून सरळ म्हणतील, ४० गावं द्यायची आहेत, ते देऊन टाकू. पंतप्रधान बोललेत उद्या पाकव्याप्त काश्मीर भारतात घेतल्यानंतर १०० गावं महाराष्ट्राला देतो असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला.

राज्यपालांवर निशाणा साधताना उध्वव ठाकरे म्हणाले की, जेव्हा सावरकरांचा अपमान केला, तेव्हा आम्ही हे सहन करणार नाही, असं बोललो. आम्ही ज्या त्वेषाने बोललो, तसं मिंधे सरकार बोललं नाही. मिंधे सरकारने राज्यपालांचा निषेध नव्हे तर त्यांनी राज्यपालांची बॅग पॅक करून त्यांना परत पाठवून देण्याची हिंमत दाखवून द्यायला पाहिजे होती. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा राज्यपालांचा आगाऊपणा मी सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून त्यांचा पूर्ण आदर बाळगतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलं आहे, त्याचा मान मी राखू शकत नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांचा उल्लेख अब्दुल गटार असा करत म्हणाले राजकिय टीका काय करायची ती करा पण सुप्रिया सुळे यांच्यावर राजकिय टीका केल्यानंतर तुम्ही शिवी देता. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ मारून हाकलून दिले असते असेही ते म्हणाले.

Check Also

अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केली १० आश्वासनांची हमी

सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जून रोजी पर्यंत अंतरिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *