Breaking News

संजय राऊत म्हणाले, त्यांना कामाख्या देवीने बोलावलं पण आम्हाला नाही कधी बोलावलं…

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही आक्षेपार्ह विधान केले. या विधानावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने जोरदार टीका केली. तरीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपालांबद्दल कोणतीच कारवाई केली नाही. नेमक्याच परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी गुवाहाटीचा दौरा केला. या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

आज मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातलं खोके सरकार आणि आसामचं काय नातं अचानक निर्माण झालंय माहिती नाही. आसामचे मुख्यमंत्री हे तसे मूळचे काँग्रेसवाले. तेही पक्षांतर करूनच भाजपात गेले आणि मुख्यमंत्री झाले. आत्ताचे आपले मुख्यमंत्रीही त्याच पद्धतीचे. त्यामुळे दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल. पण मुंबईत आता जागा नाही. नवी मुंबईत आसाम भवन आहे असे सूचक वक्तव्य केले.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना कामाख्या मंदिराच्या दर्शनाला बोलावलं असा या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी बोलवलं नाही. कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवीची आख्यायिका अशी आहे की ती न्यायदेवताही आहे. त्यामुळे जे ४० लोक तिथे गेले आहेत, त्यांच्यासोबत ती देवी न्याय करेल. महाराष्ट्रावर अन्याय करून हे ४० लोक तिथे गेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कामाख्या देवी नक्की न्याय करेल, असा टोलाही यावेळी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक होणार असल्याचे संकेत यावेळी संजय राऊतांनी दिले. संभाजीराजे छत्रपती किंवा उदयनराजेंची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवायचं काम चालू ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबाबत एक अल्टिमेटम दिला आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपाकडून ज्या पद्धतीने अपमान केला जात आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, या सगळ्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. मला वाटतं की लवकरच त्याबाबत कठोर पावलं उचलण्याबाबत निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *