Breaking News

संतोष परब हल्लाप्रकरणी राणेंना दुसरा धक्का संदेश उर्फ गोट्या सावंतचा जामीन फेटाळला पण १० दिवसांची मुदत

मराठी ई-बातम्या टीम

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला आहे. तर नितेश राणे यांचे साथीदार संदेश सावंत उर्फ गोट्या सावंत यांचाही जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावत अटकेपासून १० दिवसाचे संरक्षण दिले.

तसेच नितेश राणे यांनी छातीत दुखत असल्याचा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला असल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना उपचारार्थ कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. त्यामुळे राणे यांना हा दुहेरी धक्का असल्याची चर्चा सिंधुदूर्गात सुरु झाली आहे. निलेश राणे यांचे विश्वासू साथीदार म्हणून गोट्या सावंत हे परिचित आहेत. गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जामीन अर्ज फेटाळला असला तरी गोट्या सावंत यांना अटकेपासून १० दिवसांच संरक्षण दिले आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र त्यांना या कालावधीत स्वतः दिवाणी न्यायालयात हजर व्हावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याची माहिती त्यांचे वकील वकील राजेंद्र रावराणे यांनी दिली.

सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता. न्यायालयाने संदेश सावंत यांना दहा दिवसाचा प्रोटेक्शन कालावधी दिलेलं आहे. या दहा दिवसात त्यांनी ट्रायल कोर्टात जाऊन स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आहे. त्यांना १० दिवसाचे संरक्षण असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, असं रावराणे म्हणालेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही ट्रायल कोर्टामध्ये स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये असेल त्याप्रमाणे जामीन अर्जावर निर्णय घ्यायचा. जशी न्यायालयीन प्रक्रिया आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात झाली तशीच प्रक्रिया सावंत यांच्या संदर्भात असल्याचं सांगण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती. त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते. तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती. आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.

या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *