Breaking News

वर्षा गायकवाड यांची घोषणा, थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु होणार : परिक्षा नियोजित वेळेतच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

 मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी पर्यत राज्यातील पहिली ते १२ वी पर्यतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शाळांच्या विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरु करणार असल्याची घोषणा करत १० वी १२ वीच्या परिक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचे जाहीर केले.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यामध्ये इ.पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देशही त्यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना यावेळी दिले.

आता पुन्हा राज्यात माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे. त्यामुळे ९ वीच्या वर्गातून १० वीत जाणाऱ्या आणि १० वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांचा अपुरा राहीलेला अभ्यासक्रम पुर्ण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर १० वी १२ वी बोर्डाच्या परिक्षाही नियोजित वेळेतच घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रखडलेले शिक्षण पुन्हा एकदा सुरू होवून त्यांची शैक्षणिक प्रगती थांबणार नाही.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *