Breaking News

८१ व्या वाढदिनी जयंत पाटील यांनी सांगितले पवारांचे हे खास पैलू महाराष्ट्राचा सूर्य : शरदचंद्रजी पवार साहेब

पवार साहेबांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली. ८० वर्षाचं पवार साहेबांचं आयुष्य हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे. एखादा व्यक्ती जे काही जीवन जगतो, ते जीवन, त्या व्यक्तीचा जन्म केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील लोक साजरा करतात, हे अद्भुत आहे. मला वाटतंय कि कर्तृत्ववान या शब्दाचा जन्मच पवार साहेबांच्या जीवनासाठी झाला असावा.

महात्मा गांधी यांच्या बद्दल आईन्स्टाईन असं म्हणाले होते ‘असा जिवंत हाडामांसाचा माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत”. मी खात्रीने सांगतो, शरद पवार नावाचा आभाळाइतकं मोठं कर्तृत्व असणारा माणूस या महाराष्ट्रात आणि भारतात होऊन गेला, यावर अजून शंभर दोनशे वर्षांनी येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. कारण इतके सगळे गुण आणि इतकं कर्तृत्व एका व्यक्तीत असू शकतात यावर कोणाचाही विश्वास बसणारच नाही.

“आजन्म हारण्याचा कोठे सवाल होता ? जन्मताच माझ्या माथी गुलाल होता” हे वाक्य जर कोणाला लागू पडत असेल तर ते आदरणीय पवार साहेबांना लागू पडत. आज या जगात एकूण सात अब्ज पेक्षा सुद्धा जास्त लोक आहेत. मात्र इतिहासात नाव अजरामर करतात असे फार तर फार संपूर्ण जगात सातशे – हजार लोक असतील. त्यामध्ये अर्थात पवार साहेब आहेत. जो पर्यंत या महाराष्ट्र राज्यातून चंद्र आणि सूर्य दिसत राहतील, तो पर्यंत शरद पवार हे नाव महाराष्ट्रात अखंड उज्वल राहील.

हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात, फुले, शाहू, आंबेडकर येतात. कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण येतात आणि आज आपल्यासमोर बसलेले शरद पवार साहेब येतात. मी कधी कधी विचार करतो कि जर पवार साहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला नसता आणि कदाचित तामिळनाडू मध्ये झाला असता किंवा कदाचित आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश मध्ये झाला असता तर आज महाराष्ट्र कुठे असता

आणि पवार साहेब कुठे असते?, महाराष्ट्र कुठे असता हे वेगळ सांगायची गरज नाहीये कारण पवार साहेबांच्या शिवाय महाराष्ट्र कुठे असता याची आपण सगळे कल्पनाच करू शकत नाही. पण पवार साहेब कुठे असते ? मला खात्री आहे साहेब ज्या कुठल्या राज्यात असले असते तिथले सुद्धा ते आज सर्वोच्च्य नेतेच असले असते.

गीतेमध्ये एक शब्द आहे. ‘स्थितप्रज्ञ’. गीतेमध्ये या शब्दावर सविस्तर भाष्य आलेलं आहे. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर ज्याला सुख आणि दुःख, यश आणि अपयश, चिंता किंवा आनंद या सगळ्या गोष्टी एक समान असतात, कोणताही प्रसंग असला तरी ज्या व्यक्तीची मानसिक अवस्था हि समान असते, दुःखाने ज्या माणसाला काही फरक पडत नाही आणि यशाने देखील काही फरक पडत नाही असा माणूस म्हणजे ‘स्थितप्रज्ञ’. या स्थितप्रज्ञ अवस्थेला आदरणीय पवार साहेब खूप आधीच पोहोचले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतः ला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ अशा घोषणा महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळी दिल्या. कोणीतरी त्यावेळी म्हणाले होते, ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब समाप्त हो गया’ मला कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा नाहीय, पण जे लोक असं म्हणाले होते त्यांनी त्यांची सरकारी गाडी आणि बॉडी गार्ड सोडून महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात जाऊन बघावं, त्यांना कळेल कि कोणाच्या राजनीतीचा दौर समाप्त झालाय आणि कोणाचा सुरु झालाय ते !

आदरणीय पवार साहेबांचा सहवास हा माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला खूप महत्वाचा ठेवा आहे. मला आठवतंय कि मी कॉंग्रेस मध्ये होतो आणि अगदी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली होती, माझ्या मनात साहेबांच्या सोबत जाण्याची इच्छा होतीच, पण साहेबांच्या केवळ  एका वाक्याने मी साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, सगळं बोलून झाल्यावर साहेब मला म्हणाले होते कि “माझा मुलगा म्हणूनच मी तुला कायम वागणूक देईल साहेबांनी ते वाक्य तंतोतंत पाळल, गेले वीस वर्ष साहेबांनी मला त्यांच्या मुलासारखीच वागणूक दिली आणि माझ्यावर वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या देऊन विश्वास टाकला. आज माझ जे काही अस्तित्व आहे ते पवार साहेबांमुळेच.

आपला हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून जरी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जन्माला घातला असला तरी राज्य म्हणून महाराष्ट्र मोठा करण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलं आहे.

पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांचा आपण उल्लेख करायला लागलो तर दिवस पुरणार नाही. साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाचा केलेला नामविस्तार असू देत, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत दिलेले पन्नास टक्के आरक्षण असू देत, मुलींना वडिलांच्या संपत्तीत दिलेला अधिकार असू देत, मंडल आयोगाची केलेली अंमलबजावणी असू देत अशा अक्षरशः शेकडो गोष्टी आहेत.

आपल्या राज्यातील उद्योगपतींना घेऊन अमेरिकेत जाऊन राज्यात जास्तीत जास्त व्यवसाय यावेत यासाठी प्रयत्न करणारे या देशातील पहिले मुख्यमंत्री हे शरद पवार साहेब आहेत. गेल्या काही वर्षांत बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री त्याचा मोठा इव्हेंट करत असतात, मात्र त्या साऱ्याची सुरुवात हि आदरणीय पवार साहेबांनी खूप आधी केली होती

या देशातील अनेक मोठ्या प्रश्नांत कुठेही पडद्यासमोर न येता पवार साहेबांनी खूप महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत, मग ते पंजाब चा प्रश्न असू देत किंवा मग अयोध्या आंदोलन. कायम हा देश शांत राहावा, स्थिर राहावा यासाठी साहेबांनी प्रयत्न केले पण कधीही पडद्यावर येऊन त्याचा गवगवा केला नाही.

मला वाटतय कि या देशात आपल्या महिला भगिनींच्या उन्नतीसाठी जर सगळ्यात जास्त योगदान कोणाचं असेल तर आदरणीय पवार साहेबांचं आहे कारण देशात सगळ्यात आधी वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हिस्सा, मुलांच्या इतकाच हिस्सा देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. सैन्यदलात मुलींना काम करण्याची संधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत पन्नास टक्के आरक्षण पवार साहेबांनी दिल. लोकसभा आणि विधानसभांत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं देखील सर्वात आधी समर्थन साहेबांनी केल आहे. मला खात्री आहे कि या देशातील महिला भगिनी याबद्दल पवार साहेबांच्या प्रती कायम कृतज्ञ राहतील.

दुसरा महत्वाचा उल्लेख केला पाहिजे तो OBC समाजासाठी केलेल्या कामाचा, ज्यावेळी मंडल आयोगाचे नाव घ्यायला लोक घाबरत होते त्यावेळी साहेबांनी महाराष्ट्र मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याचं जाहीर सुद्धा करून टाकलं होतं.  अशा शेकडो गोष्टी सांगता येतील.

पवार साहेब ८० वर्षांचे झाले हे तर आहेच, पण त्यांचं सार्वजनिक आयुष्य देखील ८० वर्षांचच आहे, कारण अगदी लहान असल्यापासून ते त्यांच्या आई मा. शारदाबाई पवार यांच्यासोबत लोकल बोर्डाच्या बैठकांना जात असत. ८० वर्षांच्या साहेबांच्या सार्वजनिक आयुष्यात साहेबांना ५५ हून अधिक वर्ष अत्यंत खंबीरपणे साथ देणाऱ्या मा. प्रतिभा वहिनींच्या प्रतीदेखील आम्ही सगळे कृतज्ञ आहोत. शारदाबाई पवार यांच्या ऋणात आपण सगळ्यांनी कायम राहायलाच हवं, कारण त्या माऊलीच्या मुळेच आदरणीय साहेब महाराष्ट्राला मिळाले. त्या माऊलीने महाराष्ट्राला पवार साहेब दिले आणि पवार साहेब स्वतःच महाराष्ट्राची माऊली झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर होतं कि सामान्य घरातील लोक सत्तेच्या सर्वोच्य शिखरावर जाऊन बसावेत आणि त्यांनी तिथे जाऊन सामान्य लोकांसाठी काम करावं, आज बारामतीच्या एका छोट्या काटेवाडी नावाच्या खेड्यातून आलेला एक मुलगा या राज्याचा चारदा मुख्यमंत्री होतो, १५ हून अधिक वर्ष केंद्रातील महत्वाची मंत्रिपद सांभाळतो, या देशात लोकशाही यशस्वी झाल्याच अजून कोणते उदाहरण आपल्याला हवं आहे?

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील मोठे सरदार होते, शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर तेही मोठे चांगले सरदार झाले असते पण त्यांनी ठरवलं कि आपलं स्वतंत्र राज्य पाहिजे, ते छोट का असेना पण आपलं स्वतंत्र राज्य पाहिजे आणि महाराजांनी कोणाचं मांडलिक बनण नाकारून स्वराज्य स्थापन केल. छत्रपती शिवाजी महाराजांचाच वैचारिक वारसा पवार साहेब चालवत आहेत. त्यांनीही कायम इतर कोणाचं मांडलिक- मनसबदार बनण नाकारल आहे.

अशा आमच्या सर्वगुणसंपन्न आधुनिक जाणत्या राजाला, आदरणीय पवार साहेबांना उदंड आयुष्य दे, इतकीच देवाकडे प्रार्थना !

 लेखन- जयंतराव पाटील,

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र तथा

मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र शासन

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *