Breaking News

नवा सल्लागार: मुख्यमंत्र्यांचा स्वत:च्याच पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांवर अविश्वास शिवसेनेच्या अनुभवी मंत्री, आमदारांमध्ये नाराजी

मुंबई : प्रतिनिधी
मागील ४०-४५ वर्षे शिवसेनेसाठी काम करत आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे आणि यशस्वीतेने पार पाडली. आता सत्तेत आल्यानंतर पक्षात काल परवापर्यंत आलेल्या नवख्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यातच आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रशासनातील व्यक्तीवर सल्लागाराची जबाबदारी सोपविल्याने पक्षप्रमुखांचाच पक्षा नेते-कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? असा सवाल शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रशासकिय राजकारणात नवे असल्याने त्यांच्या मदतीसाठी संसदीय कार्यप्रणाली, प्रशासकिय कामात मदत म्हणून अनेक अनुभवी आमदार तयार होते. त्या अनुषंगाने निष्ठावान आणि जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र दोन दिवसानंतर त्यांचे पद कायदेशीर चौकटीत बसत नसल्याची बाब प्रशासनाने पुढे करत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. तेव्हापासून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना त्या पदात स्वारस्य असल्याची चर्चा सुरु झाली. सुरुवातीला भाजपा नेत्यांच्या जवळ असलेल्या मेहता यांना राज्यात अशा काही पदावर नियुक्ती केली जाईल असे वाटत नव्हते. परंतु त्यांना अखेर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आल्याने मुख्यमंत्री प्रशासनाचे ऐकून काम करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी जर वायकर यांची नियुक्ती अडचणीची ठरत होती. तर विधिमंडळ, संसदेचे सदस्य नसलेले अनेक विद्वान आणि नेते शिवसेनेत आहेत. त्यांची नियुक्ती करायची होती. आतापर्यंत शिवसेनेसाठी माती खाल्ली, प्रसंगी घरादारावर तुळशी पत्र ठेवायची तयारीही ठेवली. पक्षाच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी स्वत:चा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जात तेथून निवडून आणले. त्यासाठी वेळप्रसंगी स्वत:चे तन-मन-धन आदी गोष्टी दिल्या. मात्र पक्षप्रमुखांनी पक्षातील नेते-कार्यकर्त्यांचा विचार न करता थेट प्रशासनातील व्यक्तीला कोणत्या आधारे सल्लागार पदावर नियुक्त केले काही समजायला मार्ग नाही. यापूर्वीही संसदेत राज्यसभेवर पाठवितानाही अशाच पक्षाशी संबधित नसलेल्या व्यक्तींचा विचार केला गेला. त्यामुळे कष्ट करणारे राहीले बाजूला आणि भलतेच लोक फायदा घेवून जाताना दिसत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

या नव्या प्रधान सल्लागारांना सर्वक्षिय आमदारांशी संवाद साधणे, त्यांच्या पध्दतीने काम करणे आदी गोष्टी जमणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला नको असलेला व्यक्ती सल्लागार पदावर बसविल्याने या व्यक्तीमुळे सरकारमध्ये विसंवाद निर्माण होवू शकतो. तरीही पक्षप्रमुखांनी त्याच व्यक्तीला या पदावर का बसविले असा सवाल करत मेहता यांच्या निवडीमुळे पक्षातील अनुभवी नेते-कार्यकर्त्यांवर विश्वास शिल्लक राहीला नसल्याचे दिसून येत आहे. यानिर्णयामुळे निर्माण झालेली नाराजी पक्षप्रमुखांच्या समोर व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *