Breaking News

चैत्र चाहूल चे २०१८ चे पुरस्कार जाहिर लेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोलेंना ध्यास सन्मान

मुंबई : प्रतिनिधी

चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१८ हा पुरस्कार तरुण लेखक दत्ता पाटील आणि ध्यास सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी अविनाश गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्काराचे यंदाचे १३ वे वर्षे आहे.

पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये पंचवीस हजार असे आहे. दत्ता पाटील या तरुण लेखकाच्या ‘सेलिब्रेशन’ ह्या पहिल्याच एकांकिकेला प्रतिष्ठेचा पुरुषोत्तम करंडक लेखन दिग्दर्शन यासाठी मिळाला आहे. त्यानंतर कृष्णविवर, मध्यमपदलोपी यासारख्या दीर्घांकाला तसेच ब्लॅक आऊट, सयामी, सिटीलाईट या एकांकिकांना प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. नुकतेच त्यांचे गाजलेले नाटक ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकास मुंबई व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या दीर्घांक स्पर्धेत १ लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळाले.

अविनाश गोडबोले यांनी १९६६ मध्ये डॉ. जे. जे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथून पदवी संपादन केली. देशभरातील मोठमोठ्या प्रतिष्ठीत संस्थानमधून क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी याच संस्थेत ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांचे कला नैपुण्य कायमच त्यांच्या कामातून दृगोचित झाले आहे. त्यांचे काम गेल्या ३० वर्षांपासून निरनिराळ्या मासिके व वृत्तपत्रांमधून नावाजले गेले आहे. त्यांना १९९९ मध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून गिल्ड (कॅग) या संस्थेने ‘हॉल ऑफ फेम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने भूषविण्यात आले. त्यांनी जाहिरात क्षेत्राला मोठे योगदान दिले असले तरी त्यांचा मूळचा ओढा चित्रकलेकडे अधिक होता. आपल्या कमालीच्या व्यस्त दिनचर्येतून पुरेशी सवड मिळत नसतानाही वेळात वेळ काढून आपला चित्रकलेचा छंद त्यांनी जोपासला. अनेक उत्तमोत्तम चित्रकृती चितारल्या. १९७७ पासून त्यांच्या चित्रकृती नियमितपणे मुंबईतील अनेक कलादालानांमधून, गॅलऱ्यांमधून,प्रदर्शनांमधून पहावयास मिळाली. त्यांच्या चित्रकृतींचा गाभा ‘जीवन’ हा असून विविध प्राचीन परंपरांचा धागा पकडून तंत्र, कामसूत्र यांसारख्या भारतीय लोक कलांचे अधिष्ठान त्यांच्या या कलेला लाभल्याचा प्रत्यय येतो. अशा या कलंदर व्यक्तिमत्वाचे वास्तव व कर्मभूमी मुंबई आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अंबरीश मिश्र यांच्या हस्ते खासदार विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष – भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) (आय.सी. सी. आर.) यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण रविवार १८ मार्च, २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वा. रविंद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक विनोद पवार यांनी दिली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झालेली बी एम सी सी, पुणे या महाविद्यालयाची ‘सॉरी परांजपे’ ही एकांकिका सादर होणार असून या एकांकिकाचे लेखन चिन्मय देव व दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केलेले आहे. तसेच रुद्र एंटरप्रायजेसच्या वतीने आयोजित शास्त्रीय गायकांनी गायलेल्या गीतांवर आधारित ‘स्वरधारा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये भावगीत, अभंग, लावणी यांचाही समावेश आहे. कार्यक्रमाच्या विनामुल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या चार दिवस आधी मॅजेस्टीक बुक स्टॉल, शिवाजी मंदिर, दादर तसेच आयडीयल बुक डेपो, दादर येथून मराठी पुस्तके विकत घेऊन त्यावर मोफत प्रवेशिका मिळणार आहेत.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *