Breaking News

औरंगाबादच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जमिन उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरे यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबादेतील कचरा डेपोचा प्रश्नाला गंभीर वळण लागलेले असल्याने त्याचे परिणाम राजकिय क्षेत्रात दिसू लागले. मात्र या कचरा डेपोसाठी पर्यायी जमिन देण्यासंदर्भात शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही कचरा प्रक्रियेसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच कचऱ्याच्या प्रश्नामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे कचरा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे औरंगाबादेतील प्रश्न एक दोन महिन्यात सुटण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली.

कचरा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कचरा टाकण्यास जागा उपलब्ध नसल्याने शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा प्रश्न चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी शहरापासून १५ ते २० किमी दूर लोकवस्ती नसलेल्या भागात कचरा प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार शिवतरे, देवदत्त क्षिरसागर, युवा सेनाचे वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते.

हा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून यासाठी राज्य सरकारने पालिकेला जागेची आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण दहा हजार मेट्रिक टनवरून सहा हजार मेट्रिक टनवर आले आहे. याच धर्तीवर औरंगाबादेतही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत ही शेवटी त्यांनी यावेळी व्यक्त.

दरम्यान, औरंगाबादेतील मिटमिटा येथे कचरा डेपोच्या प्रश्नाला हिंसक वळण लागले असून जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले. तसेच पोलिस गाड्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याची पाळी आली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *