Breaking News

मित्र ना.धों महानोर यांचे निधनः शरद पवार यांची मन हेलावणारी प्रतिक्रिया अखेर वृक्ष उन्मळून पडला

शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र तथा ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.

ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथा संग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरले. १६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

साहित्य क्षेत्राबरोबरच ना. धों. महानोर यांनी राजकीय क्षेत्रातही काम केलं होतं. १९७८ साली ना. धों. महानोर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात ते कधी पडले नाहीत.
याशिवाय ना.धों.महानोर हे शरद पवार यांचे घनिष्ट मित्र म्हणूनही महाराष्ट्राला परिचित होते. तसेच कवी मनाच्या या व्यक्तीमत्वाला शरद पवार यांनी वेळावेळी आपले पाठबळ दिले.

महानोर यांच्या निधनाचे वृत्त कळताच शरद पवार यांनी ट्विट करत त्यांना श्रध्दाजंली वाहिली. यावेळी आणि वृक्ष उन्मळून पडला अशी मन हेलावणारी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार यांच्या आपल्या मित्राप्रती भावनाः-

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *