Breaking News

सावित्रीच्या लेकी…आम्ही कारभारणी महिला दिनानिमित्त सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील निवडक महिलांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख

चूल आणि मुल इतक्यावरच न थांबता काही वेगळे प्रयोग करुन समाजापुढे आदर्स निर्माण करणाèया तेजस्विनी आजही या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. वेगवेगळया क्षेत्रात त्या आपले नाव झळकावताहेत. मात्र, हे वेगळेपण जपताना प्रसिध्दिपासून दुर अशा सामाजिक कार्याला वाहून घेणाऱ्या काही तेजस्विनींची ही ओळख…

गतीमंदासाठी तिने विकले घरदार

जयश्री ! आईवडीलांची एकुलती एक मुलगी. प्रतिकुल परिस्थितीमुळे बालपणी जास्त शिक्षण घेता न आलेल्या जयश्रीतार्इंना माणसांच्या भावनांना टिपणं मात्र जन्मजात आत्मसात आहे. त्यांच्या नात्यातील एका महिलेला दोन मतिमंद मुलं होती. त्या मातेची होत असलेली ओढाताण पहाताना मुलांप्रती केवळ कोरडी सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्यासाठी काहीतरी करावं असा विचार मनात आला. कृतीला कर्तुत्वाची जोड मिळाली आणि स्थापन झाले ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालय. ठाणे येथे स्थाईक जयश्री बागडे यांनी जन्मभुमीची आठवण ठेऊन सोलापुरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात दिव्यांगांसाठी शाळा उभी केली. तीस मतिमंद मुलांच्या त्या आई झाल्या. मतिमंद आणि वेडा यामधील फरक माहित नसलेल्या अशा पालकांची मुलं समाजात चेष्टेचा विषय बनतात. अशा मुलांना जयश्रीतार्इंनी जवळ केले. एवढी मोठी जबाबदारी म्हणजे आर्थिक नियोजन आलंच. तो पैसा स्वत:चे दागिने मोडून, बंगला विकून उभा केला. ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा गतीमंद मुलांचं मातृत्व त्यांनी स्वीकारलं. जयश्रीतार्इंचा हा उपक्रम अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. स्वच्छतागृहासाठी एक महिला स्वतःचा दागिना मोडते तेव्हा प्रसार माध्यमांसोबत राजकारणीही त्याचा गाजावाजा करतात. पण, उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना त्याप्रमाणात स्थान मिळत नाही. आजचा हा प्रयत्न यासाठीच आहे.
सुजाता रायकर…. आम्ही कारभारणी


थ्यालेसेमिया म्हणजे रक्ताचा दुर्धर आजार. तो पूर्णतः अनुवांशिक आहे. बाळाचा जन्म झाल्यापासून थोड्या कालावधीनंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. बाळाला दर १५ – २० दिवसांनी रक्त पुरविणे, औषधोपचार आणि नियमितपणे रक्त चाचण्या, एमआरआय, बोन स्कॅन आदी उपचार आयुष्यभरासाठी करावे लागतात. हलाखीची परिस्थिती असणाèया कुटुंबांना हा उपचार, त्याचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेकदा आपल्या डोळ्यांनी आपल्या बालकाचे दिवसागणिक मृत्यूला कवटाळणे पहावे लागते. अशा दुर्दैवी आणि असहाय, मरणाच्या भीतीने भेदरलेल्या छोट्या मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या, जीवनात नवा आशेचा किरण आणणाèया सुजाताताई या अशा कुटुंबांसाठी देवदूतच आहेत. साथ या धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून या रोगाने पिडीत लहान मुलांच्या औषधोपचाराची जबाबदारी सौ. सुजाता चेतन रायकर यांनी घेतली आहे. एका भावूक क्षणी काजल नामक मुलीपासून सुरु झालेला हा सामाजिक प्रवास आज ९० मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या रोगाने बाधित झालेली किमान हजार मुले तरी आज मुंबईत आहेत.पैशांअभावी त्यांचे आई वडिल रोगावर उपचार करु शकत नाहीत. सुजाताताई आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा हात देतात.
आमच्यानंतर आमच्या प्रौढ मानसिक अपंग मुलीला सांभाळणार कोण ? त्यांचे भवितव्य काय ? या पालकांना सतावणाऱ्या समस्येतून  मुक्त करण्यासाठी सुरु झाली ती घरकुल संस्था. विद्याताई फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या समस्येवर विचार करतानाच अशा मुलींसाठी काही तरी प्रयत्न करण्याचा निश्चय केला. वैदेही, सुनिता या मैत्रिणींशी तर, मानसरोग तज्ञ डॉ. शिरीष सुळे यांच्याशी विचारविनिमय करून प्रायोगिक तत्वावर प्रथम एक महिना समर कॅम्प घ्यायचे ठरले. या समर कॅम्पमध्ये मुली खूप छान राहिल्या. पालकांनी मोलाचे सहकार्य केले. मुलींना दिनक्रमासोबतच काम मिळाल्यामुळे त्या खुशीत होत्या. पुढे, पालकांच्याच आग्रहास्तव हा प्रोजेक्ट कायमस्वरूपी म्हणून सुरु करायचे ठरले आणि १ नोव्हेंबर २००६ ला मुहूर्तमेढ रोवली गेली ती घरकुल या संस्थेची.
साऱ्याच कळ्यांना जन्मसिध्द हक्क आहे फुलण्याचा
मातीमधला वतन आरसा आकाशावर कोरण्याचा
जन्म असो माळावरती अथवा शाही उदयानात
प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून फुलण्याचा
तात्यासाहेबांनी या कवितेत व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न घरकुल परिवार करत आहे ! घरकुलातील या सर्व अव्यक्त कळ्यांना फुलवण्याचे, त्यांना घडवण्याचे व त्यांचे अंधारमय जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य घरकुल करत आहे. फक्त, मुलींसाठी असलेली अशी ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव संस्था. सुरवातीला अवघ्या ४ मुलींना घेऊन सुरु केलेल्या या घरकुलात आज मुंबई, पुणे, जळगाव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोलीपासून आलेल्या १८ ते ६५ वयोगटातील ४७ मुली आहेत. घरकुलचं वैशिष्ट म्हणजे हे घरकुल फक्त मुली, महिला यांच्यासाठी असून तेथे शिक्षिका व कर्मचारीसुध्दा सगळ्या महिलाच कार्यरत आहेत. स्वतःच्या घरानंतर घरकुल हे या मुलींचं आज हक्काचं घर बनलं आहे.
वडीलांच्या कवितेतील विचार वास्तवात उतरविणारी जयश्री

नतमस्तक व्हावं अशा मराठी सारस्वताला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून देणाऱ्या महान कवीची, विंदांची कन्या असलेल्या जयश्री काळे यांच्या जनवाडी, पुणे येथील जागृती संस्थेचं कार्य पाहिलं की मन थक्क होतं. घरातील मोलकरणीच्या मुलीला शिकवण्याचं निमित्त घडलं आणि त्यातून स्फूर्ती मिळाली ती झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याची. मग, काही समविचारी मैत्रिणीना एकत्र करून सुरू झाली जागृती सेवा संस्था. त्यातून हजारो मुलं शिकली. त्यांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. आज इथे शिकलेली अनेक मुलं पुढच्या पिढीसाठी ज्ञानार्जनाचं काम करत आहेत. ज्यांना आयुष्यात कधी साधं मॅट्रिकही होता आले नसते अशाना उच्च विद्याविभूषित करण्यासाठी त्यांनी केलेली किमया विलक्षण आहे. समाजहिताचा पैसा आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन तिच्यावर धैर्याने मात करणे हा संस्कार जयश्रीताईना वारसाहक्कातून मिळाला आहे. जन्मतारखेचे दाखले नसल्याने जी मुले शाळेपासून वंचित होती. त्यांचे सिव्हिल सर्जनकडून दाखले मिळवण्यात आले. ती मुले शिक्षणप्रवाहात आली. वस्तीत बालवाड्या सुरू झाल्या. वाचनालय चालू झाले. रोजचा पौष्टिक आहार, वैद्यकीय तपासण्या आणि लसीकरणामुळे मुलांचे आरोग्य सुधारू लागले. प्राजक्ता ही मुलगी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत इंजिनीअरिंगची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली. नोकरी लागल्यावर पहिला पगार आपणहून जागृतीला दिला. शिवाय संध्याकाळच्या अभ्यासवर्गाला गणित शिकवू लागली. तिच्यासारख्या चाळीस मुलींची पूर्ण काळजी घेणारं निवासगृह उभे राहिले. त्यामुळे आज पुणे परिसरातील ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलीही आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारु शकत आहेत. जयश्रीताई समाधानाने सांगतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या विदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक हात आज जागृतीला भक्कम आधार देत आहेत. यापेक्षा दुसरा मोठा आनंद तो कोणता ?
उद्योजिकांच्या पंखांना बळ हवे…

उच्च शिक्षित असूनही टिपिकल नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याची धडपड आजही अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे. महिला आणि त्यातही मागास समाजातील महिला म्हणून येणाऱ्या अडचणींवर मात करत पुरुषप्रधान व्यवस्थेत आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात अनेक महिला आज यशस्वी झाल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे औरंगाबदच्या शितल डोंगरे पगारे होय..

औरंगाबदच्या असलेल्या शितल डोंगरे या माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीधर आहेत. महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी स्वतः कष्ट करतच पूर्ण केले. त्यामुळे त्यांना तेव्हापासूनच कष्टाची सवय होती. शितल यांनी शिक्षण संपल्यानंतर काही ठिकाणी नोकरी केली. मात्र, पहिल्यापासून काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असल्यामुळे त्यांचे कुठल्याही नोकरीत समाधान झाले नाही. जॉब सॅटिसफॅक्सन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न केला.

पहिल्यांदा त्यांनी २००७ मध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलाझरची खत विक्रीची डिलरशिप मिळवली. पहिल्यांदा छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला. मात्र, या व्यवसायातील जुन्या लोकांचे व आरसीएफमधील काही जणांचे हितसंबंधामुळे नव्या लोकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे व्यवसायातही म्हणावे तसा जम बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी ही डिलरशिप सोडून दिली.

डिलरशिप सोडल्यानंतरही त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या एचपी सेवेसंबंधीची माहिती मिळाली. एचपीसीएलने या नवा उपक्रमाद्वारे महिला उद्योजकांना निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली होती. या प्रशिक्षणातून मागास समाजातील नव उद्योजक घडविण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न अत्यंत यशस्वी झाल्याचे श्रीमती शितल आवर्जून सांगतात. या प्रशिक्षण कार्यक्रमसाठी आलेल्या अर्जामधून लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे ३५ जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये शितल डोंगरे यांचा समावेश होता. या सर्वांना मुंबईत एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कामांचे छोटे छोट्या निविदा काढल्या व त्या या महिला उद्योजकांना देण्यात आल्या.

यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा महिला उद्योजिका म्हणून प्रवास सुरू झाला. यासाठी त्यांनी महिलांचे छोटे छोटे बचत गट तयार केले. सध्या त्यांच्याकडे सात बचत गट असून सुमारे २५ ते ३० महिला काम करतात. या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आपला स्वतःचा असा खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरू केले. यामध्ये शुगर फ्रि गुलाबजाम, महिलांसाठी हिमग्लोबिन वाढविणारे विशेष पदार्थ, फिश रेड करी, फिश करी, फिश सूप सारख्या सुमारे पन्नासहून अधिक पदार्थांचा समावेश आहे. सन २०१५-१६ व  १६-१७ मध्ये त्यांच्या व्यवसायाचा सुमारे आठ लाखांचा टर्नओव्हर आहे. यातून त्यांच्या व्यवसायाची कल्पना येऊ शकेल.

व्यवसाय वाढत असला तरी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. व्यवसासायाठी मुंबईला यावे लागत असे. त्यावेळी प्रवासापासून ते राहण्याच्या सोयीपर्यंत सर्वच गोष्टींना तोंड द्यावे लागल्याचे त्या सांगतात. त्यातच लहान मुलगी असल्यामुळे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे मुंबईत एकट्याने येणे, एचपीसीएलच्या माहूल येथील कार्यालयात जाऊन कामाची बोलणी करणे, व्यवसाय वाढविण्यासाठी विविध ग्राहकांना भेटण्यासाठी जाताना येणाऱ्या अडचणी आदी संकटांना तोंड देत, त्यांनी व्यवसाय जोमाने सुरू केला.

उद्योग उभारण्यासाठी व तो चालविण्यासाठी स्वतःला आलेल्या अडचणी उद्योगात येणाऱ्या नव्या महिलांना येऊ नये, यासाठी त्या त्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. व्यवसाय करताना ग्राहकांशी कसे बोलावे, शासकीय कार्यालयातील कामे कशा पद्धतीने हाताळावी, याचे प्रशिक्षण श्रीमती शितल सर्व महिलांना देतात.

श्रीमती शितल डोंगरे म्हणतात की, शासन महिला उद्योजकांना पुढे आणण्यासाठी अनेक योजना घोषित करते. मात्र, महिलांना येणाऱ्या बेसिक अडचणी समजून घेऊन त्या प्रमाणे सोयीसुविधा देण्यात शासन कमी पडते. महिला उद्योजकांना व्यवसायासाठी सवलतीच्या दरात भूखंड देणे, ग्राहकांबरोबरच्या मिटिंगसाठी फ्रि झोन निर्माण करणे, उद्योजिकांच्या लहान बाळांसाठी पाळणाघरसारखी सोय करणे आदी पायाभूत गोष्टी जर शासनाने केल्या तर खऱ्या अर्थाने महिला उद्योजक निर्माण होतील.

अनेक अडचणींना येत असूनही मागास समाजातील एक महिला उद्योजिका म्हणून पुढे येण्यास धडपडत आहे. श्रीमती शितल सारख्या अनेक महिला आज या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत. अशा महिलांना पाठिंबा देण्यासाठी समाजाबरोबरच शासनानेही पाठबळ देणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने सक्षम उद्योजिका उदयास येतील.

ज्येष्ठ पत्रकार महेश पवार, पत्रकार प्रिया मोहिते 

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *